डोंबिवली शहरात मराठी शाळेची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सरलाताई समेळ यांचे नुकतेच निधन झाले. डोंबिवलीतील शैक्षणिक विश्वात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या कार्य कर्तृत्त्वाचा आढावा घेणारा हा लेख…
चाळीस पन्नासच्या दशकात मुबईतून विशेष करुन गिरगाव भागातून अनेक सर्वसामान्य कुटुंब डोंबिवली, कल्याणच्या दिशेने कायमस्वरुपी निवाऱ्यासाठी आली. अशाच एक कुटुंबांमध्ये समेळ कुटुंबीय होते. दत्तात्रय समेळ हे आपल्या कुटुंबासह डोंबिवलीत राहण्यासाठी आले. डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या जागेत समेळ वाडय़ाची उभारणी केली. सत्तर ते ऐशी वर्षांपूर्वी डोंबिवली हे वाडे, बंगले आणि चाळींचे गाव म्हणून ओळखले जात होते. इमारतींची संख्या त्या मानाने दुर्मिळ होती. या सगळ्या वाडे संस्कृतीत समेळ वाडा उभा राहिला होता. दोन बैठय़ा इमारती अशी या वाडय़ाची रचना होती. दत्तात्रय समेळ हे या कुटुंबियांचे प्रमुख. डोंबिवलीला रहायला आल्यानंतर दत्तात्रय समेळ यांना डोंबिवली गावात सर्वसुखसुविधा आढळल्या पण, प्राथमिक शिक्षणाची पुरेशी सुविधा नसल्याचे दिसून आले. हा विचार त्यांच्या मनाला अस्वस्थ करीत होता. घरातील मोठी मुलगी सरला हिला त्यांनी हा विचार बोलून दाखविला होता. वडिलांच्या मनातील अस्वस्थता दूर करणे आणि त्यांचा संकल्प तडीस नेण्याचा निर्धार सरला यांनी मनोमन केला. अविवाहित राहण्याचा निर्णय सरला यांनी वडिलांना सांगितला. वडिलांच्या प्रेरणेतून सरलाताईंनी वाडय़ाच्या आवारात प्राथमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचा निर्णय घेतला. आयुष्य विद्यादानासाठी वाहून घेण्याचा संकल्प सोडला.
प्राथमिक शाळा सुरूकरण्यापूर्वी डोंबिवली गावातील काही ओळखीच्या घरी जाऊन त्यांनी आपण सुरू करीत असलेल्या शाळेविषयी माहिती दिली. गावकऱ्यांनी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाला पाठिंबा दिला. डोंबिवलीत सुरुवातीला स. वा. जोशी शाळा ही इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत होती. त्यामुळे पहिली ते चौथीपर्यंतचे मुलांचे शिक्षण कुठे पूर्ण करायचे, असा प्रश्न अनेक पालकांसमोर होता. या सगळ्या परिस्थितीचा विचार करुन १९५६ मध्ये एक मुलगी व दोन मुले घेऊन समेळबाईंनी प्राथमिक शाळा सुरू केली. शाळेत बालगोपाळ येणार असल्याने शाळेचे नाव शिशुकुंज प्राथमिक शाळा ठेवण्यात आले. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी विष्णुनगर, ठाकुर्ली, रामनगर, पेंडसेनगर अशा शहराच्या विविध भागात राहत असलेले पालक आपल्या मुलाच्या शाळेतील प्रवेशाविषयी विचारणा करण्यास येऊ लागले. शाळेत शिशू, बालवर्ग आणि इयत्ता पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग. विद्यार्थी वरच्या वर्गात जाऊ लागले तसे, वर्ग वाढत गेले. बघता बघता शिशुकुंज शाळा समेळबाईंची शाळा म्हणून ओळखली जा़ऊ लागली. १९५९ मध्ये शिशुकुंज शाळेला सरकारी मान्यता मिळाली. सुरुवातीला शाळा चालविताना बाईंना आर्थिक कसरत करावी लागली. सरकारी मान्यतेमुळे ही कसरत काही प्रमाणात थांबली.
शिडशिडीत बांध्याच्या समेळबाई कडक शिस्तीच्या भोत्या होत्या. आदरयुक्त दरारा, करडी नजर या सुत्रावरच शाळेचा कारभार सुरू होता. समेळबाईंचा दरारा आणि नजर हीच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘छडी’ होती. शिस्तप्रिय शाळा म्हणून नावलौकिक झाल्यावर शाळेत विद्यार्थी संख्या वाढली. इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंतचे दोन-दोन वर्ग तयार झाले. त्यात शिशु आणि बालवर्ग. असा दहा वर्गांचा पसारा बाईंनी आपल्या प्रयत्नातून वाढविला. दर्जेदार शिक्षण, मुले कडक शिस्तीच्या नजरेखाली शिकत असल्याने गावातील उच्च, मध्यमवर्गिय, सामान्य आपल्या मुलांना शिशुकुंज शाळेत प्रवेश मिळेल यासाठी धडपडू लागला.शाळेत सगळा महिलांचा कारभार होता. त्यामुळे त्यात एक शिस्त होती. शाळेत सगळ्या महिला शिक्षिका असल्याने संस्थापिका सरला समेळ यांना शाळेत ‘मोठय़ा बाई’ म्हणून शेवटपर्यंत ओळखले जात होते.
शाळा आणि श्री गणपती मंदिर यांच्यामध्ये एक संरक्षक भिंत होती. बुध्दिदेवतेच्या ओटय़ावर आपण मुलांना घडवित आहोत, याचे एक आत्मिक समाधान समेळबाईंना देऊन जात असे. शाळेच्या चोहोबाजुने फुलांची झाडे होती. शाळेच्या आवारातील चाफ्याचे झाड विद्यार्थ्यांचे खास आकर्षण होते. अनेक वेळा वर्गात बाई शिकवत असताना अचानक आलेला चाफ्याचा फुलांचा दरवळ, शनिवारी सकाळच्या वेळेत चाफ्याखाली पडलेला फुलांचा सडा, शाळेची सहल, तेथील मौजमजा, सांस्कृतिक कार्यक्रमातील गमतीजमती हे चित्र आजही बाईंचे विद्यार्थी, जुन्या शिक्षिकांच्या नजरेसमोर आहे. समेळबाईंनी डोंबिवलीत आजोबा, वडिल आणि त्यांची मुले अशा तीन गुणवत्तापूर्ण पीढय़ा शाळेच्या माध्यमातून घडविल्या. समेळबाईंप्रमाणेच सुरुवातीच्या काळात फणसेबाईंच्या फणसे विद्यामंदिराने गुणवान विद्यार्थी घडविले. समेळबाईंच्या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी देश-परदेशात बँका, कापरेरेट कंपन्या, खासगी आस्थापना, व्यवसायांमध्ये मोठय़ा हुद्दय़ांवर नोकरी करीत आहेत. समेळबाईंच्या निधनाचे वृत्त समाजमाध्यमातून जगभरात असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना समजले. त्यानंतर समाजमाध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी समेळबाईंच्या प्रती व्यक्त केलेल्या भावूक भावना सरकारच्या ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कारपेक्षाही बाई किती मोठय़ा आणि महान होत्या, हे दिसून येते.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत