News Flash

शाळेतील पहिल्या पावलाचा ठसा

शाळेत विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्याशी एक आपुलकीचे नाते तयार करणे म्हत्त्वाचे असते.

 

सरस्वती मंदिर ट्रस्टचा उपक्रम

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार जून महिना उजाडला की जसा पावसाळा येतो, तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षही सुरू होते. त्यातही अगदी पहिल्यांदाच शाळेत पाऊल टाकणारी चिमुरडी आणि त्यांच्या पालकांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. ती आठवण कायमस्वरूपी स्मरणात रहावी यासाठी ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती शाळेच्या पूर्व-प्राथमिक विभागातर्फे ‘पहिलं पाऊलं’ हा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या पाल्याचा शाळेतील पहिल्या दिवसाचे पहिलं पाऊल पालकांच्या कायम स्मरणात रहावे या उद्देशाने येथे येणाऱ्या प्रत्येक चिमुकल्या पावलांचे ठसे घेण्यात आले. एवढेच नव्हे तर ‘या शिक्षणाच्या प्रवासात आम्ही पालकही तुझ्या सोबत आहोत’ हे सांगण्यासाठी आई-बाबा आणि पाल्य यांचे एकत्रितपणे प्रतिकात्मक हाताचे ठसे घेण्यात आले.

या शाळेच्या पूर्व-प्राथमिक विभागाचे नाव किलबिल घर असे ठेवण्यात आले असून येथे ‘चिऊ-चिऊ’, ‘म्याऊ-म्याऊ’, ‘विठू-विठू’ आणि ‘भाऊ-भाऊ’ असे चार वर्ग आहेत. पहिल्यांदा पुठ्ठय़ांपासून तयार करण्यात आलेल्या चॉकलेट, ढग अशा विविध आकारांच्या फलकांवर त्यांचे विद्यार्थ्यांचे नाव लिहले जाते. हे फलक हातात घेऊन विद्यार्थी वर्गात प्रवेश करतात. त्यानंतर वेगवेगळ्या रंगामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेत पडलेल्या पहिल्या पाऊलांचा ठसा एका कोऱ्या कागदावर घेतला जातो. त्याची एक प्रत पालकांना भेट दिली जाते. शाळेतर्फे गेली सहा वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रवासात पालकही त्यांच्या सोबत आहेत हे दर्शवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचे एकत्रित पणे हाताचे ठसे घेण्यात येतात. तसेच एकमेकांमध्ये मैत्रीचे बंध निर्माण होण्यासाठी भिंतीवर कागदाचे झाड तयार करुन विद्यार्थ्यांना एकत्र त्यावर हाताचे ठसे उमटविण्यास सांगितले जाते.

शाळेत विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्याशी एक आपुलकीचे नाते तयार करणे म्हत्त्वाचे असते. आई नंतर बाई म्हणजेच शिक्षिका  विद्यार्थ्यांचे बौद्धीक संगोपन करत असतात. त्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून पालक विद्यार्थी आणि शाळा अशी त्रिसुत्री एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल ही एक भावनिक संकल्पना राबवून शाळा आणि पालकांमध्ये बंध घट्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.

रती नरेंद्र भोसेकर, मुख्याध्यापिका, पुर्व-प्राथमिक विभाग, सरस्वती विद्यालय, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:13 am

Web Title: school first day saraswati school thane
Next Stories
1 सीमेंट रस्त्याला डांबराचा आधार
2 शासकीय संथ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका
3 निवडणुकीच्या तोंडावर योजनांची मुसळधार!
Just Now!
X