नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्या पालकांचा जीव आपल्या मुलांभोवती घुटमळत असतो. विशेषत: मुले शाळेत जाणारी असतील तर ती व्यवस्थित पोहोचली का, वेळेत घरी परतली का, अशी चिंता त्यांना सतावत असते. शाळेत जाताना किंवा शाळेतून परतताना मुलामुलींचे अपहरण झाल्याच्या अनेक घटनांनी पालकांच्या मनात कायमची दहशत निर्माण केली आहे. मात्र बदलापुरातील काही शाळांनी पालकांना या बाबतीत निर्धास्त करणारी यंत्रणा कार्यान्वित करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. पाल्य शाळेत पोहोचल्यावर आणि बाहेर पडल्यावर एसएमएसद्वारे सूचना देणारी ही यंत्रणा पालकांना चिंतामुक्त करणारीच नाही, तर विद्यार्थ्यांनाही सुरक्षितता पुरवणारी आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐरोली येथे एका चिमुरडीचे शाळेतून घरी परतत असताना अपहरण झाले व तिची हत्या करण्यात आल्याचे नंतर निष्पन्न झाले. त्या प्रकरणात मुलीच्या नातलगाचाच सहभाग होता. मात्र शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याच्या किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या अनेक घटना आजवर उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे आपली मुले शाळेत सुरक्षित आहेत का, असा घोर पालकांना सतत लागलेला असतो. या पाश्र्वभूमीवर बदलापूरमधील शिवभक्त विद्या मंदिर आणि सिंड्रेला इंग्लिश स्कूल या शाळांनी ‘स्टुडंट रेकग्निशन सिस्टीम’ (विद्यार्थी ओळख यंत्रणा) कार्यान्वित केली आहे. विद्यार्थ्यांने शाळेत प्रवेश करताच या यंत्रणेद्वारे त्याची नोंद केली जाते आणि त्याप्रमाणे पालकांच्या मोबाइलवर तातडीने ‘पाल्य शाळेत पोहोचला’ असा संदेश पाठवला जातो. विद्यार्थी शाळेच्या आवारातून बाहेर पडल्यावरही अशाच प्रकारे संदेश पोहोचवला जातो.
‘स्टुडंट रेकग्निशन सिस्टीम’ अतिशय सोप्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्यादप्तरांना इलेक्ट्रॉनिक चीप असलेला टॅग बसवण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेचा जिना चढू लागला की वर छताला बसवण्यात आलेले उपकरण दप्तराच्या टॅगची नोंद करते आणि त्यानुसार पालकांना माहिती पुरवली जाते.
‘गेल्या सहा-सात महिन्यांपासून ही यंत्रणा शाळेत कार्यरत असून सॉफ्टटेक सोल्युशन्सचे राहुल भावे यांनी ही यंत्रणा शाळेत सुरू केली आहे. शिवभक्त विद्या मंदिर व सिंड्रेला इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांच्या मिळून एक हजार विद्यार्थ्यांच्या दप्तरात असे टॅग लावण्यात आले आहेत,’ अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.

अनेक विद्यार्थ्यांचे पालक कामानिमित्त घराबाहेर असतात. हल्ली मुलांच्या बाबतीत अनेक अनुचित प्रकार घडतात. त्यामुळे हे पालक काळजीत असतात. त्यामुळे त्यांचा पाल्य सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी व त्यांना सुरक्षेची हमी मिळावी. म्हणून आम्ही ही यंत्रणा शाळांमध्ये बसवली आहे.
– ज्ञानेश्वर म्हात्रे, मुख्याध्यापक, शिवभक्त विद्या मंदिर