करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सुरू केलेल्या शाळा १५ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या व तोपर्यंत ऑनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत.
गेल्या वर्षीचा डिसेंबर ते गेल्या महिन्यापर्यंत दररोज जिल्ह््यात ३५० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. मात्र, सरासरी ५०० च्या पुढे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सुरू केलेल्या ५ वी ते १२ वीपर्यंत शाळा आणि महाविद्याालये १५ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या आदेशाचे पत्रक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहे.
जिल्ह््यात गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे जिल्ह््यातील सर्व महापालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आणि महाविद्याालये २७ जानेवारीपासून जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह््यातील ग्रामीण क्षेत्र, शहापूर आणि मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा, महाविद्याालये तसेच वसतीगृहात शिक्षण सुरू झाले होते. मात्र, ते आता नव्या आदेशामुळे पुन्हा बंद झाले आहे.