बोटीच्या छतावर जाऊ नका, असे या मुलींना मी वारंवार बजावत होतो. पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उत्साहाच्या भरात त्या सेल्फी काढण्यासाठी गेल्या आणि काही क्षणांत बोट उलटून बुडाली, असेचालक महेश अंभिरे यांनी सांगितले. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या बोटीची क्षमता ३० जणांची होती. मात्र  विद्यार्थ्यांनी आग्रह केल्याने जास्त विद्यार्थ्यांना बोटीत घेतल्याचेही महेश यांनी सांगितले. बोट बुडताच स्थानिकांनी आणि तटरक्षकांनी धाव घेत २१ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले, तर नऊजणांनी पोहून किनारा गाठला. यातील संस्कृतीचा चिखलात रूतलेला मृतदेह हेलिकॉप्टरच्या साह्य़ाने बाहेर काढावा लागला.

या धक्क्यातून या मुलींचे कुटुंबीय अद्याप सावरलेले नाहीत. ‘‘माझी मुलगी रोज दुपारी महाविद्यालयातून वेळेवर घरी यायची. ती सहलीला गेली आहे, हे आम्हाला माहीतच नव्हते. त्यामुळे आज तिची खूप वाट पाहिली, पण ती आलीच नाही.. ती गेल्याचाच निरोप आला,’’ असे डहाणूच्या सागरी दुर्घटनेत मृत झालेल्या सोनल सुरतीची शोकाकुल आई इंदिरा यांनी सांगितले.

सोनल हिला दोन विवाहित बहिणी आहेत. शाळेत शिकणारा एक लहान भाऊ आहे. अर्धागवायूचा झटका आल्याने तिचे वडील अंथरुणाला खिळले आहेत. बांबूच्या टोपल्या बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालतो. शिकणाऱ्या या मुलीकडून खूप स्वप्ने होती ती आता उद्ध्वस्त झाली आहेत.

मृत जान्हवी सुरतीचे वडील हरेश हेही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. ‘‘आम्हाला जान्हवीच्या मित्रांचा फोन आला तेव्हा आम्हाला या दुर्घटनेबाबत समजले. आधी आम्ही रुग्णालयात वाचलेल्या मुलांमध्ये तिचा शोध घेतला पण आम्ही दुर्देवी ठरलो,’’ असे त्यांनी सांगितले. ही महाविद्यालयाची अधिकृत सहल नव्हती. त्यामुळे या घटनेने धक्का बसल्याचे के. एल. पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान इंगळे यांनी सांगितले. महाविद्यालयाने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

परवाना नव्हता

काही दिवसांपूर्वीच ‘डहाणू किंग’ नावाची फायबर बोट डागडुजी करून सुरू करण्यात आली होती. या बोटीला मेरीटाइम बोर्ड तसेच आमची परवानगी नव्हती, असे डहाणू पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बोटमालक धीरज अंभिरे आणि सहचालक पार्थ अंभिरे यांना अटक केल्याच पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त बोटीचा चालक महेश अंभिरे रुग्णालयात उपचार घेत असून तो रुग्णालयातून आल्यावर त्याला अटक केली जाणार आहे.