फेसबुकवरील ‘शिवसेना नको बाबा’ मोहिमेला ‘भाजपचा पप्पू’ने उत्तर

शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरून सुरू झालेले ‘युद्ध’ आता आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. फेसबुकवरून सुरू झालेल्या ‘शिवसेना नको रे बाबा’ या मोहिमेमागे भाजपच असल्याचा आरोप करत सेनेनेही भाजपविरोधात ‘ई वॉर’ छेडले आहे. महाराष्ट्रभर भाजपमध्ये सुरू झालेल्या गुंडांच्या प्रवेशावर थेट हल्ला चढवीत पप्पू कलानी यांचा पुत्र ओमी कलानी यांच्या सोबत साधलेल्या जवळीकीला लक्ष्य करताना ‘हा पहा भाजपचा पप्पू’ असा आक्रमक प्रचार शिवसेनेने सुरू केला आहे. त्याच वेळी ‘शिवसेना नको बाबा’ या फेसबुक पेजवरून सेना नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा करताच समाजमाध्यमांद्वारे शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू करण्यात आला असून यामागे भाजपची छुपी यंत्रणा कार्यरत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. ठाण्यात ‘शिवसेना नको बाबा’ या फेसबुक पानावरून पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. या नेत्यांचा थेट गुंडांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यात आले असून, त्यामुळे शिवसेनेत संतापाची भावना आहे. छुप्या पद्धतीने सुरू असलेला हा ऑनलाइन हल्ला पाहून त्यास प्रत्युत्तर देण्यास आता शिवसेना नेतेही सरसावले असून नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ‘सोशल सैनिक’ या गटाने भाजपला तत्काळ प्रत्युतर देण्यास सुरुवात केली आहे. वादग्रस्त नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या संभावित भाजप प्रवेशावरदेखील वॉट्सअ‍ॅप संदेशामार्फत हल्ला चढविला जात असून ‘सुसंस्कृत भाजप गुंडांचा भाजप’ अशी खोचक टिप्पणी त्यावर करण्यात आली आहे. ‘ठाणे भाजप गुंडांचा भाजप ’  असे फेसबुक पेज तयार करण्यात आले असून, भाजपमार्फत पावन करण्यात आलेले गुंड, वादग्रस्त नेत्यांची इत्थंभूत माहिती त्यावर दिली जात आहे.

चोरों के सन्मान में..

ठाणे महानगरपालिकेने केलेली विकासकामे शिवसेना ठाणे या अ‍ॅप्लिकेशनद्वारे पोस्ट केली जात असून महापालिकेमार्फत झालेल्या विकासकामांची माहिती, चित्रफितींचा प्रचारही केला जात आहे. हे करत असताना ‘चोरों के सन्मान में भाजप मैदान मे’ असे खास पान तयार करण्यात आले असून, उल्हासनगरात पप्पू कलानीपुत्र ओमी यांच्यासोबत झालेल्या आघाडीचा पंचनामा त्यावर करण्यात आला आहे.

दाढी टिप्पणीला उत्तर

ठाणे भाजपचे नेते संदीप लेले यांनी दाढीवाल्या बुवाला घाबरू नका, असा टोला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना लगावताच त्याच विधानाचा आधार घेत ‘ठाण्यातले भाजप नेते मोदी-शहांच्या दाढीच्या दहशतीखाली’ असे अधोरेखित करून त्यांच्या विधानाची खिल्ली उडविण्यात येत आहे.

पोलिसांना निवेदन

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या दरम्यान सेना-भाजपची युती तुटताच समाजमाध्यमांद्वारे भाजपने सेनेवर निशाणा साधला होता. त्या वेळी शिवसेना नेते सुरुवातीला गाफील राहिले. या घटनेची पुनरावृत्ती ठाणे महापालिकेच्या निवडणूकीदरम्यान होऊ शकते याची कुणकुण आम्हाला लागली होती. असा प्रकार आढळल्यास या वेळी शांत बसायचे नाही आणि कठोर पाउले उचलण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना भेटून यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिले.