मागील पाच वर्षांत रखडलेल्या विकासकामांमुळे कल्याण डोंबिवलीकर अक्षरश हैराण झाले असताना आगामी निवडणुकीला सामोरे जाताना करून दाखविल्याचा जयघोष करण्यासाठी मंगळवारी दिवसभर शिवसेनेने शहरातील विविध विभागातील विकासकामांचा शुभारंभाचा सपाटा लावल्याचे चित्र दिसून आले. तसेच या सोहळ्यापासून भाजप आमदार दूर रहातील, अशी व्यूहरचनाही करण्यात आल्याने दोन्ही पक्षांती दरी अधिक रूंदावली आहे.

२७ गावांसंबंधी निर्णय घेताना भाजपने शिवसेनेची कोंडी केल्याचे चित्र पुढे आले. तसेच महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषाही भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला असून उद्घाटनांच्या कार्यक्रम पत्रिकेत भाजपच्या आमदारांना दुय्यम स्थान देण्यात आल्याची चर्चा होती. यापैकी काही विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाईल, अशी घोषणा सुरुवातीला शिवसेनेच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी केली. कार्यक्र म पत्रिकेत ऐनवेळेस मुख्यमंत्र्यांचे नावही टाकण्यात आले. मात्र, शुभारंभ सोहळ्यात भाजप आमदारांना दुय्यम स्थान दिले जात असल्याने मुख्यमंत्रीही या कार्यक्रमांपासून दूर राहिल्याचे समजते. डोंबिवलीतील भाजप आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार तसेच कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना या सोहळ्यात केंद्रस्थानी ठेवायचे नाही, अशी रणनीती सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आखल्याचे समजते.