आनंद परांजपे यांच्याविरोधात वरिष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना पदावरून हटविण्याची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना गाठून त्यांना परांजपे यांच्याविरोधात तक्रार पत्र पाठावावे, असे सांगितले जात असून यासाठी प्रदेश स्तरावरील काही नेतेच पुढाकार घेत असल्याने पक्षातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे.

ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना पदावरून हटविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पक्षातील ठरावीक नेत्यांनी मोहीम उघडली होती. या मोहिमेमुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड होऊन शहराध्यक्ष बदलाचे वारे सुरू झाले होते. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. शहराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रदेश पातळीवरून निवडणूक निरीक्षक म्हणून अशोक पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शहराध्यक्ष निवडीबाबत गेल्या महिन्यात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शहराध्यक्ष परांजपे यांच्याविरोधात कुणीही तक्रारी केल्या नव्हत्या तसेच यासंबंधी इच्छाही प्रकल्प केली नव्हती, असे सांगितले जाते. त्यामुळे कळवा-मुंब्र्याचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचा वरदहस्त लाभलेले आनंद परांजपे हेच या पदावर कायम राहतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र,  गेल्या महिनाभरात सुरू झालेल्या काही घडामोडींमुळे परांजपे यांच्याविरोधात एक मोठा गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

पक्षातील वरिष्ठ पातळीवरील काही नेत्यांनी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना गाठून परांजपे यांच्याविरोधात तक्रारपत्र देण्याची सूचना केल्याचे समजते.  या पत्राचा मसुदा पक्षाचे निवडणूक निरीक्षक अशोक पराडकर यांनी ठाण्यातील एका नगरसेवकाला पाठविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या मसुद्याचा मजकूर असलेला व्हॉट्सअ‍ॅप संदेशाचा ‘स्क्रीनशॉट’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या संदर्भात पराडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशाप्रकारचा मजकूर कुणालाही पाठविला नसून ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले. तसेच शहराध्यक्ष पदासंबंधीचा अहवाल वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे सादर केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत असून त्यांच्या आदेशाप्रमाणेच पक्षाचे काम करीत आहे. त्यामुळे त्यांचा जो आदेश असेल, तो मला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.