व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर दुकान निर्बंध मागे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर शनिवार आणि रविवारी जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने शुक्रवारी घेतला असून या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी होती. या निर्णयाविरोधात डोंबिवलीतील सुमारे दोनशेहून अधिक व्यापाऱ्यांनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर सायंकाळी निर्बंध मागे घेण्याचा निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आज, रविवारी दुकाने सुरू राहणार असली तरी सोमवारी मात्र दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

करोना संकटामुळे गेले काही महिने व्यापारी आणि व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. वर्षभरानंतर आता व्यापारी, व्यावसायिकांची आर्थिक घडी काहीशी रुळावर येत असल्याचे चित्र होते. सण, उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांचा व्यवसाय होतो.  एकीकडे अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली बहुतांशी दुकाने, दारूविक्री, व्यापार सुरू राहणार असून दुसरीकडे अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने जवाहीर, कपडा आणि तत्सम दुकाने मात्र बंद राहणार आहेत. हे व्यापाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. विवाह, हळदी, लोकल, बसमधील गर्दी यामुळे करोना वाढत असून ही बाब प्रशासनालाही माहीत आहे. करोना संसर्गाच्या सर्व नियमांचे आम्ही पालन करून व्यवसाय करतो. मग दुकानांची गळपेची का, असा प्रश्न जवाहीर संघटनेचे दिलीप कोठारी यांनी केला आहे. कल्याणमधील व्यापारी आयुक्तांच्या भूमिकेमुळे नाराज झाले आहेत. दुकान ही एक लहानशी कंपनी आहे. तेथे कामगार काम करतात.  गेल्या वर्षी आठ ते नऊ महिने दुकाने बंद होती. यामुळे अनेकांना दुकानाच्या जागेचे भाडे भरता आले नाही. त्यामुळे ते व्यापारी दुकान बंद करून गुजरात, राजस्थानला निघून गेले. अनेक कामगार बेरोजगार झाले, अशी माहिती कल्याणमधील व्यापाऱ्यांनी दिली. दुकान बंद केले तर व्यापारी कसा रस्त्यावर येऊ शकतो याचा अभ्यास पालिकेने करावा, अशी मागणी कल्याणमधील व्यापाऱ्यांनी केली होती.   भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून या विषयावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, त्यांनी सायंकाळी झालेल्या ऑनलाइन बैठकीत पालकमंत्री आणि आयुक्तांशी चर्चा केली. या चर्चेनंतर पालकमंत्री शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार सूर्यवंशी यांनी दुकानबंदीचा निर्बंध मागे घेतला आहे.