१९४४ सालातील ‘जॉर्ज व्ही किंग एम्परर’ चा उल्लेख; जतन करण्याची मागणी

डोंबिवली पश्चिमेतील कोपर रस्त्यावरील गावठाणातील एक ऐंशी वर्षांपूर्वीचे जुन्या पद्धतीचे घर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तोडल्यानंतर त्या घरात ब्रिटिशकालीन तिजोरी व चांदीसारखी काही नाणी सापडली आहेत. तिजोरी लोखंडी असून खूप अवजड आहे. या तिजोरीचा एक दरवाजा प्रयत्न करूनही उघडला गेलेला नाही. ही तिजोरी पाहण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली आहे.

तिजोरीत सापडलेल्या नाण्यांवर १९४४ सालचा उल्लेख आहे. त्यावर राजाची टोपीधारक प्रतिमा आहे. जॉर्ज व्ही किंग एम्परर असा इंग्रजीतून उल्लेख या नाण्यांवर आहे. तिजोरीचा एक कप्पा विविध अवजारांचा वापर करून ग्रामस्थांनी उघडला. पण दुसरा कप्पा कितीही प्रयत्न करून उघडत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कोपरगावातील बाबू गणपत म्हात्रे (तांडेल) यांचे ऐंशी वर्षांपूर्वीपासूनचे घर खाडीकिनारी गावठाण भागात आहे. बाह्यवळण रस्त्यामध्ये या भागातील काही घरे येत असल्याने पालिकेने दोन दिवसांपूर्वी या घरांवर कारवाई केली. त्यावेळी पाडकाम सुरू असताना चौदाच्या भिंतींच्या कपारीत ही तिजोरी आढळून आली. गावठाणातील जमीन ब्रिटिश काळात शेतक री, ग्रामस्थांना दिली आहे. तीच घरे पालिकेने जमीनदोस्त केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या तिजोरी, नाण्याची माहिती घेऊन योग्य ठिकाणी जतन करून ठेवावीत, अशी मागणी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

विकासकांच्या सोयीसाठी घरे तोडली

कोपरगाव गावठाणाच्या बाजूला एका लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या गृहसंकुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी पोहच रस्ता नसल्याने गावठाणातील जमिनीचा त्यासाठी आधार घेतला आहे. रस्तारुंदीकरणासाठी बंगले, चाळी तोडल्या असल्या तरी या भागातील काही रहिवाशांची घरे मात्र वाचविण्यात आल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.