सिग्नल शाळेतील प्रवेशानंतर भीक न मागण्याचा निर्धार

सिग्नलजवळ रात्रीच्या वेळी खेळत असताना वेगाने आलेला ट्रक शंकरच्या थेट पायावरून गेला. त्या गंभीर अपघातामुळे शंकर स्वत:च्या पायावर नीट उभा राहू शकेल का याविषयी शंका असतानाच सिग्नल शाळेने त्याला जगण्याची नवी उमेद दिली. तेथील शिकणुकीच्या आधारे तो नव्याने आयुष्याचे धडे गिरवू लागला आहे. त्या अपघातात त्याच्या पायाला काही प्रमाणात अपंगत्व आले असले तरी मनाचा निश्चय कायम ठेवत यापुढे कधीही भीक मागणार नाही, असे शंकरने ठामपणे सांगितले. दिवसभराची विक्री कमी झाल्यावर रस्त्यावर भीक मागण्यासाठी आई-वडिलांनी कितीही तगादा लावला तरी आज सिग्नल शाळेत शिकत असलेले प्रत्येक मूल आता भीक मागायला आवडत नाही हेच सांगतात.

सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा वस्तूंची विक्री करत इतरत्र फिरणाऱ्या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सिग्नल शाळा सुरूकरण्यात आली आहे. सुरुवातीला काही मोजक्याच मुलांसह सुरूकरण्यात आलेल्या या शाळेत सध्या सिग्नल परिसरात विविध वस्तूंची विक्री करणारी पूर्वप्राथमिक ते माध्यमिक वर्गातील मुले-मुली ज्ञानाचे धडे गिरवतात. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. या शाळेत सहाव्या इयत्तेत शिकत असलेल्या शंकर पवार या विद्यार्थ्यांचा वर्षभरापूर्वी सिग्नलजवळ खेळत असताना अपघात झाला. सर्वसामान्य कुटुंबातील पालकांसाठी आपल्या मुलासोबत घडलेला अपघात विषण्ण करणारा असेल, मात्र शंकरच्या आई-वडिलांना याचे गांभीर्य नव्हते. जगण्याची शिस्त नाही, व्यक्तिमत्त्व घडेल असे संस्कार नाहीत, शिक्षकांशीही सतत उध्दट वर्तन, परिस्थितीविषयी मनात असलेला उद्वेग अशा शंकरला अपघातानंतर समर्थ भारत व्यासपीठने योग्य उपचार उपलब्ध करून दिले. त्याच्या पायाला जणू नवी संजीवनीच दिली. त्यामुळे शंकर त्याच्या पायावर उभा राहिला आणि सिग्नल शाळेने त्याला जगण्याचा सन्मार्ग दाखविला.

ज्ञानार्जनासोबत अर्थाजनही

पायाच्या दुखण्याचा बाऊ न करता शाळेचे तास संपल्यावर शंकर सिग्नलवर स्वत: विक्री करुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावतो. हातावर पोट असणाऱ्यांपैकी अपघात झाल्याचा गैरफायदा घेत भीक मागण्यासाठी पाऊले सिग्नलकडे वळू शकतात. शंकरने मात्र सिग्नल शाळेतच भविष्य गिरवायला सुरुवात केली आहे. उपचारादरम्यान सिग्नल शाळेतील प्रत्येक शिक्षकाने शंकरची घेतलेली काळजी त्याचे आयुष्य बदलणारी ठरली आहे. अपघात आम्हा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी नवीन नाही. पण शाळेत दिलेले संस्कार व उपचारादरम्यान घेतलेली काळजी कधीच विसरू शकत नाही, हे सांगताना शंकर गहिवरतो. सुरुवातीला उद्धट वर्तुणूक असलेला शंकर सिग्नल शाळेतील संस्कार आणि सहवासामुळे जगण्याचे मूल्य शिकला आहे. हा बदल  सिग्नल शाळेला अपेक्षित आहे, असे आरती परब म्हणाल्या.