ठाणे : मुंब्रा येथील कौसा भागात रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने रिक्षातून प्रवास करणारा सहा वर्षांचा मुलगा रस्त्यावर पडला आणि त्याच वेळेस बाजूने जाणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. मुंब्र्यायातील भारत गिअर्स परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकरचालक अब्दुल रेहमान (३७) याला अटक करण्यात आली आहे.

संकेत संजय मोरया (६) असे अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुरडय़ाचे नाव आहे. संकेत हा मुंब्र्यायातील शिबलीनगर भागात राहत होता. संकेत हा त्याच्या आईसोबत रिक्षाने खर्डी येथून मुंब्रा येथे जात होता. रिक्षा भरधाव असताना चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे आईच्या मांडीवर बसलेला संकेत रिक्षातून बाहेर फेकला गेला. त्यावेळेस बाजूने जाणाऱ्या पाण्याच्या टँकरखाली सापडून संकेतचा मृत्यू झाला.