वसईतील धक्कादायक घटना, सावत्र मुलास अटक

मध्यरात्रीच्या सुमारास कर्णकर्कश संगीत लावून नृत्य करत असताना रोखल्याचा राग धरून एका ३३ वर्षीय युवकाने आपल्या सावत्र पित्याची चाकूने वार करून हत्या केली. वसईच्या बाभोळा येथील अग्रवाल संकुलात शुक्रवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. वडिलांची हत्या करून शांतपणे घरात येऊन बसलेल्या या युवकास अटक करण्यात आली आहे.
वसईच्या बाभोळा येथील अग्रवाल संकुलातील जानकी निवास या इमारतीत रेग्नल्ड अ‍ॅमल्टन (५३) हे पत्नी जेनिफर आणि सावत्र मुलगा अ‍ॅशली मार्क डेक्स्टा ब्रेथ (३३) याच्यासह राहात होते. एका शाळेत शिक्षिका असलेल्या जेनिफर यांनी मुंबईतील एका वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम करत असलेल्या रेग्नल्ड यांच्यासोबत दुसरे लग्न केले. अ‍ॅशली हा त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे.
बेरोजगार असलेल्या अ‍ॅशलीचे आपल्या सावत्र वडिलांसोबत नेहमीच भांडण होत असे. गुरुवारी मध्यरात्री अ‍ॅशली घरी आला. त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने मोठय़ा आवाजात संगीत लावून नृत्य करण्यास सुरुवात केली. कर्णकर्कश संगीताच्या आवाजाने झोपमोड झाल्याने रेग्नल्ड आणि जेनिफर यांनी आपल्या खोलीतून बाहेर येथून अ‍ॅशलीला हा प्रकार थांबवण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. त्यानंतर अ‍ॅशलीने स्वयंपाकघरातून चाकू त्यांच्यावर वार केले. त्यात रेग्नल्ड यांचा मृत्यू झाला.