ठाण्यात आणखी दोन संकुले विनानिविदा भाडेतत्त्वावर; राजकीय प्रभावाखाली पालिका निर्णय घेत असल्याची तक्रार

कळवा-मुंब्रा भागातील ‘संघर्ष’शील नेत्यासोबत झालेल्या मनोमीलनानंतर कौसा येथील भव्य स्टेडियम कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता मर्जीतील ठेकेदाराला बहाल करणाऱ्या ठाणे महापालिकेने ढोकाळी येथील शरच्चंद्र पवार क्रीडा संकुल आणि कोरम मॉलजवळील शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन कोर्टही विनानिविदा ठरावीक संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. ठाण्यातील राजकीय नेत्यांसोबत जुळवून घेण्याच्या प्रशासकीय धडपडीतून हे निर्णय घेतले जात असल्याची उघड चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

ठाणे महापालिकेमार्फत शहरातील विविध भागांत क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली असून ही संकुले संस्थांना भाडेपट्टय़ावर देण्याचे कोणतेही ठोस धोरण अद्याप आखले गेलेले नाही. त्यामुळे काही संकुलात तसेच महापालिकेने उभारलेल्या वास्तूंवर ठरावीक संस्थांचीच मक्तेदारी आहे. या परिस्थितीत बदल व्हावा, यासाठी क्रीडा संकुलांसह महापालिकेच्या वास्तू भाडेपट्टय़ावर देताना स्वारस्य अभिव्यक्ती देकार राबवण्याची घोषणा पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मध्यंतरी केली होती. मात्र, हे धोरण आखण्यात जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचे चित्र आहे. तसेच धोरण नसल्याचा गैरफायदा घेऊन ठरावीक संस्था किंवा व्यक्तींना ही संकुले विनानिविदा भाडेतत्त्वावर दिली जात आहेत.

कौसा येथे सुमारे ४० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम एका खासगी संस्थेला विनानिविदा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. या स्टेडियमचा वापर होत नसल्याने भाडेपट्टय़ावर दिल्यास येथे नागरिकांचा राबता वाढेल, असा तर्क यासाठी पुढे करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कळवा-मुंब्रा येथील एका ‘संघर्ष’शील नेत्याच्या निकटवर्तीय संस्थेला ही वास्तू भाडेपट्टय़ावर देण्यात आल्याचे उघड होत आहे. ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या प्रक्रियेला विरोध केल्यानंतर पालिकेने ही प्रक्रिया रद्द केल्याचे चित्र उभे केले. मात्र, काही महिन्यांतच याच संस्थेला ही वास्तू देण्यात आली.  हे प्रकरण ताजे असताना आता सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून ढोकाळी येथे उभारलेले शरच्चंद्र क्रीडा संकुल आणि ओंबळे बॅडमिंटन कोर्टसुद्धा अशाच पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर खासगी संस्थांच्या घशात घातले जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंबंधीचे प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आले आहेत.

राजकीय नेत्यांसाठी ‘खेळ’

प्रशासनाने नव्याने मांडलेल्या प्रस्तावानुसार ढोकाळी येथील पवार मिनी स्टेडियम हे मे. संकल्प सेवा मंडळाला दिले जाणार आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या एका नेत्याशी संबंधित हे मंडळ असून क्रीडा क्षेत्रातील कोणताही ठोस अनुभव नसताना या संस्थेस हे संकुल चालविण्यास देणार आहेत. प्रयोगिक तत्त्वावर याच संस्थेची निवड कशी करण्यात आली याविषयी कोणतेही ठोस कारण प्रशासनाने प्रस्तावात दिलेले नाही. आणखी एका प्रस्तावात ओंबळे बॅडमिंटन कोर्ट हे कोणत्या संस्थेला देणार याबाबतचा उल्लेख नाही मात्र ही दोन्ही क्रीडा संकुले अभिव्यक्ती स्वारस्य देकारांचे धोरण अंतिम होईपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून द्यावेत असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. मात्र, मुंब्रा आणि शरद पवार संकुलाचा अनुभव बघता या संकुलाचा प्रयोगही राजकीय आग्रहास्तव होणार असल्याची चर्चा आहे.