वसईच्या पश्चिम पट्टय़ातील शेकडो प्रवाशांना फटका; ग्रामस्थांमध्ये संताप

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील ग्रामस्थांचा आधार असणाऱ्या एसटीचे नऊ  मार्ग बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसणार आहे. अचानक हा निर्णय घेतल्याने या परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

राज्य परिवहन महामंडाळाकडून (एसटी) वसईत नालासोपारा आणि वसई आगारातून एसटी सेवा सुरू आहे. वसई आगारातून नऊ  बसगाडय़ा गिरीज, रानगाव, भुईगाव तर नालासोपारा आगारातून नाळा, उमराळा, भुईगाव, कळंब, राजोडी आदी मार्गावर सोळा बसगाडय़ा चालवल्या जातात. मात्र या मार्गावरील ९ एसटी बसगाडय़ा बंद करण्याचे एसटी महामंडळाने ठरवले आहे. त्याबाबत एसटीच्या पालघर नियंत्रकांनी १ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला लेखी कळवले आहे. एसटी बंद होणार असल्याने वसई-विरार महापालिकने या मार्गावर पालिकेची बससेवा सुरू करावी, अशी विनंतीही आयुक्तांना केली आहे. अचानक एसची बंद केल्यामुळे पश्चिम पट्टय़ातील गावांमध्ये संताप पसरला आहे. हा आमचा विश्वसघात आहे, अशी प्रतिक्रिया विकी दोडती या ग्रामस्थ तरुणाने दिली आहे. पहाटे तीन वाजता पहिल्या ट्रेनपासून ते मध्यरात्री अडीच वाजता शेवटच्या ट्रेनपर्यंत एसटी चालते. घरी येण्यासाठी एसटी एकमेव वाहन आहे. अचानक ९ मार्ग बंद केल्याने हजारो प्रवाशांचे हाल होणार असल्याचे दोडती यांनी सांगितले.

मोक्याच्या जागा बळकाविण्याचे षडयंत्र

निर्भय जनमंचनेही या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप निर्भय जनमंचचे अध्यक्ष मनवेल तुस्कानो यांनी केला. एसटीने यापूर्वी अर्नाळा डेपोच्या बस बंद केल्या. हळूहळू ते सर्व मार्ग बंद करत आहेत. एसटीच्या मोक्याच्या जागा बळकावण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला, तर पालिकेच्या खाजगी ठेकेदाराला फायदा पोहोचावा यासाठी हे मार्ग बंद केले जात असल्याचेही ते म्हणाले.

 पुन्हा आंदोलन पेटणार

‘एसटी वाचवा’ म्हणून फादर फ्रन्सिस दिब्रिटो आणि कवी सायमन मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली वसईत मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनामुळे एसटी सेवा बंद करण्याचा प्रयत्न फसला होता. आता पुन्हा आंदोलन करण्यासाठी  ग्रामस्थ एकवटत आहेत. त्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.