ठाणे महापालिका क्षेत्रातील एक स्वतंत्र उपनगर म्हणून ओळख असलेला कळवा परिसरही सध्या विकासाच्या मार्गावर येत स्मार्ट सिटी होऊ पाहत आहे. पारसिक किल्ल्यामुळे कळव्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. इतर शहरांप्रमाणे सुरुवातीच्या काळात कळव्यातली लोकवस्तीही रेल्वे स्थानकाभोवतीच एकवटलेली होती. स्थानकापासून पाचच मिनिटांच्या अंतरावरील ‘राणा टॉवर’ त्यापैकी एक. आता ही वसाहत ‘एकदंत’ नावाने ओळखली जाते.

ठाणे-कळवादरम्यान कळवा स्थानकाच्या थोडे अलीकडे जे सरळ रेषेत उंच संकुल नजरेस पडते, ते राणा संकुल. या संकुलामुळे या परिसरातील इतर निवासी संकुले, दुकाने, शाळा आदी ठिकाणे शोधायची झाल्यास ती सापडणे सहज शक्य झाले आहे. राणा संकुल आता ‘एकदंत’ जरी झाले असले आताही जुन्याच नावाने ते ओळखले जाते.

राणा संकुल म्हणजेच एकदंत निवासी संकुल उभारण्याचे काम २००१ पासून सुरू झाले.  २००३ पासून येथे लोक राहायला येऊ लागले. १२ गुंठे जागेवर प्रत्येकी ११ मजल्यांच्या चार इमारती या संकुलात आहेत. येथील बहुसंख्य कुटुंबे महाराष्ट्रीय आहेत.

कळवा रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वेची कारशेड आहे. या जागेवर पूर्वी लोकवस्ती तर आता जिथे एकदंत सोसायटी आहे, तिथे शेतजमीन होती. कालांतराने रेल्वेच्या दुरुस्तीसाठी कळवा ठिकाण हे सोयीस्कर असल्याची जाणीव रेल्वे प्रशासनाला झाल्यानंतर येथील लोकवस्ती हटवून त्यांचे पुनर्वसन एकदंत संकुल परिसरात करण्यात आले. या परिसरातील काही भाग रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत मोडतो. जिल्हा प्रशासनाने रेल्वेकडून ही जागा घेऊन या कारशेडच्या लोकवस्तीचे पुनर्वसन केल्याची माहिती एकदंत सोसायटीचे सचिव संतोष म्हामुणकर यांनी दिली. एकदंत संकुलही रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आले असले तरी ती जागा आता जिल्हाधिकारी प्रशासनाच्या अखत्यारीत मोडते, असे त्यांनी सांगितले.

एकदंत संकुल बांधताना रहिवाशांना उद्यान देण्याचे कबूल केले होते. मात्र प्रत्यक्षात उद्यान तयार करण्यात आले नाही. उंच संकुल उभारताना संभाव्य दुर्घटना गृहीत धरून उपायोजना कराव्या लागतात. खरे तर ११ मजल्यांची इमारत बांधताना आठवा मजला सुरक्षित मजला म्हणून बांधणे गरजेचे होते. जेणेकरून आगीसारखी एखादी दुर्घटना ११ व्या मजल्यावर घडली तर तेथील रहिवाशांना आठव्या मजल्यावर सुरक्षित स्थळी हलवून तेथून अग्निशमन दलामार्फत वाचवता येऊ शकते. मात्र बांधकाम व्यावसायिकाने तसे न करता आठवा मजल्यावरही सदनिका बांधून त्या विकण्याचा घाट घातला होता; परंतु संकुलातील रहिवाशांनी एकजुटीचे दर्शन घडवीत हा कट  उधळून लावला. त्यामुळे आठवा मजला सुरक्षिततेचा उपाय म्हणून तत्पर आहे. घर खरेदी करताना ग्राहकांना देण्यात येणाऱ्या प्रकल्प अहवालात व्यापारी गाळ्यांचा उल्लेख नव्हता. मात्र तरीही संकुलात गाळ्यांचे बांधकाम करून ते व्यापाऱ्यांना विकण्यात आले. त्याचप्रमाणे स्टिल्ट पार्किंगही विकण्यात आले होते. याविरोधातही रहिवाशांना तीव्र संघर्ष करावा लागला. न्यायालयीन लढाई करावी लागली. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार या अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करून हे गाळे रिकामे करण्यात आले. या वेळी दहशत आणि दडपशाहीविरुद्ध रहिवाशांनी संघटित वृत्तीने विजय मिळविला. सध्या तीन गाळे बांधकाम व्यावसायिकाच्या ताब्यात असून ते बंदच असतात.

बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम मजबूत केले आहे. सुमारे अडीच मजली भूमिगत पाया असल्याने इमारत गेली १३ वर्षे मजबूत स्थितीत आजही ताठ मानेने उभी आहे. भिंतीत साधा खिळाही ठोकायचा झाल्यास मोठा आटापिटा करावा लागतो. सुरक्षेच्या दृष्टीने आणि अग्निशमन दलाच्या मदतीसाठी आठवा मजला रिकामा असून तिथे अग्निशमन दलाने सुरक्षेच्या दृष्टीने सुचविलेली अत्यावश्यक यंत्रणा तैनात आहे. त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे आगीसारखी घटना येथे घडली तर तातडीने काय उपाययोजना करावी याचे प्रशिक्षण काही सभासदांना देण्यात आले आहे. येथे वॉटरप्रूफिंग केल्याने गळतीचे प्रकार नाहीतच.

गॅलरीत झाडे लावल्याने त्याचे पाणी इमारतीत झिरपते. त्यामुळे इमारत कमकुवत होण्याचा संभव असतो. हा धोका निर्माण होऊ नये यासाठी सदनिकेच्या गॅलरीत केवळ एकच तुळशी वृंदावन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेस्ट कंट्रोल वेळोवेळी होत असल्याने झुरळे, मुंग्या आदी कीटकांचा त्रास जाणवत नाही. बांधकाम व्यावसायिकाने भविष्याच्या दृष्टीने सुरक्षेचा विचार करता सीसीटीव्हीही येथे लावले होते; परंतु त्याची काळजी घेतली न गेल्याने ते नादुरुस्त झाले. त्यानंतर ते नव्याने बसविण्यात आले. सीसीटीव्ही यंत्रणा लावणारे ‘एकदंत’ हे कळव्यातील पहिले संकुल आहे, या यंत्रणेसह चार सुरक्षारक्षकही तैनात आहेत, अशी माहिती सोसायटीचे माजी पदाधिकारी आणि सक्रिय सदस्य महेश गांगण यांनी दिली. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष हे व्यवसायाने वकील असल्याने कायदेविषयक अडचणी असल्यास त्या चुटकीसरशी सोडविण्यास त्यांची मदत होते. तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी विशेष अशी तांत्रिक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास ती ताबडतोब सुटते असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहनतळासाठी मुबलक जागा

अनेक सोसायटय़ांना वाहनतळाचा प्रश्न भेडसावतो, एकदंत संकुलात मात्र त्यासाठी पुरेशी जागा आहे. तीन स्टिल्ट पार्किंगव्यतिरिक्त इतर जागाही मोकळी असून त्या जागेत ३३ चार चाकी गाडय़ा उभ्या राहू शकतात. त्याचप्रमाणे अनधिकृत गाळे हटविण्यात आल्याने त्या जागेचा वापर दुचाकी वाहने उभी करण्यासाठी होतो. ५० दुचाकी वाहने येथे सामावू शकतात.

कूपनलिकेचे पाणीही पिण्यायोग्य

ठाणे महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त येथे कूपनलिकेचाही पर्याय आहे. विशेष म्हणजे कूपनलिकेचे पाणीही पिण्यायोग्य आहे. श्री शंकराचे पुरातन मंदिर, खेळाची दोन मैदाने आणि बाजारपेठही अगदी जवळच आहे. डीम्ड कन्व्हेअन्सची प्रक्रिया सध्या सुरू असून ती पूर्ण झाल्यास संकुलातील गाळेही सोसायटीच्या ताब्यात येतील अशी आशा असून ती ताब्यात आल्यास सोसायटीचे कार्यालय आणि इतर गाळ्यांचा सदुपयोग करणे शक्य होईल, असा विश्वास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आहे.

सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

संकुलात दरवर्षी सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. गुढीपाडवाच्या दिवशी परिसरात शोभायात्रा काढण्यात येते. त्यात संकुलातले रहिवासीही सहभागी होतात. पाणी वाचवा, गोहत्या बंदी आदी विषय घेऊन प्रबोधनात्मक चित्रमय संदेश संकुलातर्फे देण्यात येतो. सलग चार वर्षे संकुलाने शोभायात्रेतील उत्कृष्ट प्रबोधनात्मक सादरीकरणाचा बहुमान मिळविला आहे. स्नेहसंमेलन दोन दिवसांचे असले तरी त्याची रेलचेल १५ ते २० दिवसांपासूनच सुरू असते. चित्रकला, वक्तृत्व, निबंध, नृत्य स्पर्धा आदींसह ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक असे अनेक कार्यक्रम त्यात असतात. क्रिकेट, धावणे, आदी मैदानी स्पर्धा काही वेळा संकुलाच्या परिसरात तर काही वेळा संकुलासमोरील मैदानात होत असतात. होळी, दहीहंडी, दिवाळी, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आदी सण, उत्सवही साजरे केले जातात. दिवाळीत किल्ले तयार करण्याठी संकुलातील बाल मावळ्यांची जणू स्पर्धाच लागलेली असते. कार्यक्रमासाठी संकुलाचे आवारच वापरण्यात येत असल्याने त्या वेळी येथे उभ्या असलेल्या गाडय़ा इतरत्र हलविल्या जातात. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील रसिकांचीही गर्दी होत असते. वार्षिक सहली काढल्या जातात. या कार्यक्रमांसाठी सांस्कृतिकसमितीची स्थापना करण्यात आली आहे. महेश गांगण हे त्याचे नियोजन करत असतात. संकुलात विजेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. तो इमारतीच्या मागच्या बाजूस रेल्वेच्या जागेत हलविल्यास ट्रान्सफॉर्मच्या जागेचा वापर पर्जन्य जलसंधारणासाठी करण्याचा सोसायटीचा विचार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाण्याचा पुनर्रवापर करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीही हालचाल सुरू असल्याचे गांगण यांनी सांगितले.