नीलेश पानमंद

करोना विषाणू संसर्ग होण्याच्या भीतीपोटी अनेक खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये तापाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेत नसल्याने त्यांचे हाल होत असतानाच आता ठाण्यातील आजारी भटक्या आणि पाळीव प्राण्यांनाही करोनाच्या भीतीमुळे उपचार मिळणे मुश्कील झाल्याचे चित्र आहे. आजारी भटक्या तसेच पाळीव प्राण्यांना रुग्णालयात घेऊन येणाऱ्या नागरिकांमार्फत करोना संसर्ग होऊ  शकतो, अशी भीती आहे. याशिवाय, दुसऱ्या शहरातून रुग्णालयात येणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांसाठी वाहतुकीची सुविधा नसल्याने अपुरा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या कारणांमुळेच उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे शहराच्या विविध भागांत पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी खासगी दवाखाने आहेत. मात्र, भटक्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ठाण्यातील ब्रह्मांड परिसरात एसपीसीए हे एकमेव रुग्णालय असून त्या ठिकाणी भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार केले जातात, तर पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी नाममात्र रक्कम आकारली जाते. सामाजिक भावनेतून हे रुग्णालय चालवण्यात येते. या रुग्णालयात २५ जण कार्यरत आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असून यामुळे आसपासच्या शहरांतून रुग्णालयात प्राण्यांवर उपचार करण्यासाठी येणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत एका डॉक्टरसह चार ते पाच जण रुग्णालयात कार्यरत असून सतत रुग्णवाहिकेतून प्रवास शक्य नसल्याने त्यांना दोन दिवस रुग्णालयात काम करावे लागत आहे, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांकडे पीपीई किट उपलब्ध नाहीत आणि आजारी भटक्या तसेच पाळीव प्राण्यांना रुग्णालयात घेऊन येणाऱ्या नागरिकांमार्फत करोना संसर्ग होऊ  शकतो. यामुळे केवळ अत्यावस्थेत प्राणी असेल तरच त्याला उपचारासाठी दाखल करून घेतले जात असून अन्य प्राण्यांना मात्र उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने केवळ पाच ते सहा जणांचे पथक रुग्णालयात कार्यरत असून त्यांच्याकडे पीपीई किट उपलब्ध नाहीत. आजारी भटक्या तसेच पाळीव प्राण्यांना रुग्णालयात घेऊन येणाऱ्या नागरिकांमार्फत करोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावस्थेतील प्राण्यांनाच उपचारासाठी दाखल करून घेतले जात असून आजारी भटक्या प्राण्यांवर शक्य असेल त्याप्रमाणे उपचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

– डॉ. सुहास राणे, सचिव, एसपीसीए रुग्णालय