उल्हासनगर येथील प्रेमनगर परिसरात बुधवारी रात्री भटक्या कुत्र्याने घराबाहेर खेळत असलेल्या एका चिमुरडीच्या नाकाचा लचका तोडल्याची घटना घडली. घराच्या अंगणात खेळणाऱ्या मुलीवर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला आणि तिच्या नाकाला चावा घेतला. यावेळी एका महिलेने वेळीच तिला वाचवल्यामुळे चिमुरडीची सुटका झाली. या चिमुरडीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

उल्हासनगरमध्ये प्रेमनगर भागात किरण बागल हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी त्यांची अडीच वर्षांची मुलगी प्रांजल ही घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने अचानक तिच्या नाकाचा चावा घेतला. कुत्र्याने तिचे नाक दातात पकडत तिला खेचून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेने सतर्कता दाखवत तिची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र या हल्ल्यात प्रांजलच्या नाकाचा लचका तोडला गेला असल्याने तिला गंभीर जखम झाली.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी भटके कुत्रे पकडणाऱ्या पथकाला बोलावून या कुत्र्याला त्यांच्या ताब्यात दिले. या कुत्र्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत पाच नागरिकांचा चावा घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली.