डोंबिवली पूर्व भागातील गोग्रासवाडीत पालिकेच्या निधीतून उद्यान विकास, पदपथ दिवे लावण्याची कामे करण्यात आली आहेत. मात्र या कामाची नासधूस केली जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
गोग्रासवाडी भागातून एक नाला गेला आहे. या नाल्याचा काही भाग अनेक वर्षे अंधारात होता. या भागात पथदिवे बसवण्याची मागणी रहिवाशांनी या भागातील लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्यामुळे रात्री उशिराही या भागातून ये-जा करणे शक्य होईल, असे रहिवाशांचे म्हणणे होते. ही मागणी विचारात घेऊन महापालिकेच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून या भागात पथदिवे बसवून घेण्यात आले. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. असे असताना काही समाजकंटकांनी या पथदिव्यांना विजेचा पुरवठा करणारी विद्युतवाहिनी जाळून टाकल्याने या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गोग्रासवाडी भागात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या तसेच नगरसेविका निधीतून स्थानिक नगरसेविकेने सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च करून उद्यान विकसित केले आहे. या उद्यानाच्या कुंपणाला काही दिवसांपूर्वी भगवा झेंडा फडकविण्यात आला. उद्यान लोकांसाठी आहे, त्याचे विद्रूपीकरण कोणी करू नये म्हणून हा झेंडा उतरविण्यात आला. याच प्रभागात आणखी एक पडझड झालेले उद्यान आहे. तेही विकसित करण्याचे काम प्रभागात सुरू आहे. या ठिकाणच्या ठेकेदाराला, त्यांच्या मजुरांना या भागातील काही राजकीय पुढारी दमदाटी करीत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका वैशाली दरेकर यांनी केली आहे.