अंबरनाथ : टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली शहरातील भाजी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रस्ते आणि पदपथावर बस्तान मांडल्याचे दिसून येत आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत फेरीवाल्यांनी रस्ते तसेच पदपथ गिळंकृत केले होते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरही फेरीवाल्यांचे पदपथांवर बस्तान असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेल्या या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

एप्रिल महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा होती. शहरातील काही फेरीवाल्यांनी अत्यावश्यक वस्तू विक्रीच्या नावाखाली पदपथ आणि रस्ते गिळंकृत केल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजीनगर येथील शिवसेना शाखेजवळील चौकातील प्रमुख रस्त्याची एक मार्गिका एका फेरीवाल्याने भाजी विक्रीचे कॅरेट लावून बंद केल्याचे दिसून आले आहे. लोकनगरी रस्ता ते काटई कर्जत राज्यमार्गाच्या प्रवेशापर्यंत पदपथ आणि रस्त्याच्या निम्म्या भागापर्यंत भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. गेल्या काही दिवसांत याच भागात पदपथावर मटण, चिकन विक्री आणि चायनीज पदार्थ विक्रेत्यांनीही तात्पुरते मांडव घालून व्यवसाय सुरू केला आहे. त्याचा फटका या भागातील वाहतुकीला बसतो. अनेक ग्राहक रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काटई – कर्जत राज्यमार्गाला जोडणाऱ्या लोकनगरी रस्त्याच्या चौकातही अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने चौक निमुळता झाला आहे. त्याचा काटई – कर्जत राज्यमार्गावरील वाहतुकीलाही फटका बसतो आहे. त्यामुळे रस्ते आणि पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बदलापुरातही टाळेबंदीत फेरीवाल्यांचे आव्हान

बदलापूर शहरातही टाळेबंदीच्या काळात भाजी विक्रेत्यांनी विविध रस्ते, पदपथ, चौक व्यापले. अनेक नवे विक्रेते या काळात स्थानक, बाजारपेठ परिसरात आल्याचे येथील दुकानदार सांगतात. दुकाने बंद असताना दुकानांच्या बाहेर, पदपथावर आणि रस्त्यावर यांचे बस्तान होते. दुकाने सुरू झाल्याने हे विक्रेते आणि दुकानदारांमध्ये वाद होण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वेळीच या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. याबाबत संबंधित  विभागाकडून माहिती घेऊन अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले जातील.

– डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका