News Flash

पाण्यासाठी पुन्हा संघर्ष सुरू

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.

वसई पूर्वेला भीषण टंचाई

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. वसई पूर्वेतील गावात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीतील शहरी भागात सूर्या पाणी प्रकल्पातून मुबलक पाणी येत असले तरी पूर्वेकडील गावांना पाणी पोहचले नसल्याने येथील नागरिकांना विहिरी, तलावे आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. वसई पूर्वेतील भागात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा या परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील नागरिकांची वणवण सुरूच आहे. जिथे पाणी मिळेल तेथून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये लहान चिमुकल्याही आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या आई-बाबांना पाण्यासाठी मदत करीत असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.   ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र तेही काम पूर्ण न झाल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेऊन जलवाहिन्या अंथरण्याचे काम सुरू केले असून कामण, देवदल, चिंचोटी, पेल्हार, कोल्ही, या ठिकाणी १००, १५०, २०० मि. मी. लांबीच्या व्यास निहाय जलवाहिन्या अंथरुण येथील पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात येणार होता, परंतु त्या कामातही दिरंगाई होत असल्याने अजूनही या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध झाले नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.पाणी प्रश्नाच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी प्रभाग समिती ‘जी’ चे सहायक आयुक्त राजेंद्र कदम यांना दूरध्वनीद्वारे  संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी

मार्च महिना सुरू होताच पाणीटंचाईची समस्या अधिक गडद बनू लागली आहे. प्रभाग क्रमांक ८९ मधील बेलकडी, कामण, चिंचोटी , सागपाडा, सातीवली, गिदराईपाडा यासह इतर खेडय़ापाडय़ांत अजूनही पालिकेची पाणी योजना पोहचली नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या भागात पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी पालिकेकडे केली आहे.

कामण भागातील विविध ठिकाणच्या भागात दरवर्षी पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असते. त्यामुळे येथील नागरिकांना अक्षरश: खड्डे मारून व विहिरीवर जाऊन पाणी उपसा करावा लागत आहे.

— महेश विरारकर, नागरिक कामण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 1:12 am

Web Title: struggle for water dd 70
Next Stories
1 ‘अ‍ॅप’मुळे महसुलात वाढ
2 अर्थसंकल्प सादरीकरण मुखपट्टीअभावी वादात
3 वाहनमालकाचा मृतदेह आढळल्याने गूढ वाढले
Just Now!
X