पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही सर्वाची आहे. यासंबंधीची जाणीव प्रत्येकाला झाली तर पर्यावरण संवर्धनासाठी  ठोस असे कार्य उभे राहू शकेल. हे लक्षात घेऊन ठाण्यातील डॉ.बेडेकर विद्यालयाचे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. अभ्यासाची ओझी डोक्यावर वाहताना तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षा बंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पोषक राख्या बनविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पोषक अशा राख्यांची विक्री करून समाजील गरजूंना मदत करण्याचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुमारे दीड हजार राख्या बनवल्या आहेत. पर्यावरण ढासळत असल्याची ओरड सातत्याने होत आहे. मात्र, पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक प्रयत्नांची सुरुवात मुलांमध्ये केली तर कदाचित त्याचा परिणाम अधिक चांगला जाणवेल, असा शाळेच्या व्यवस्थापनाचा दावा आहे. पर्यावरणाला हानी पोहचेल अशी कोणतीही वस्तू न वापरता राख्या तयार करण्याचा उपक्रम हा याच प्रयत्नांचा भाग आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन दरवर्षी डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेत आयोजित करण्यात येते. शाळेच्या हस्तकला शिक्षिका कल्पना बोरवणकर या गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम शाळेत अत्यंत यशस्वीपणे राबवत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ वी ते ७वीचे सुमारे दीड हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. शाळेतील विद्यार्थ्यांना या राख्या विकत घेता याव्यात यासाठी बाजारभावापेक्षा स्वस्त दरात त्यांची विक्री केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आपल्या मित्र मंडळींनी बनवलेल्या राख्या मोठय़ा उत्साहाने शाळेतील इतर विदयार्थी खरेदी करतात. त्यातून एक नवचैतन्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विक्रीतून मिळालेले पैसे सामाजिक जागृतीचे भान म्हणून समाजातील गरजूंसाठी उपयोगात आणले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनाही निर्माण होते, असे विचार शाळेच्या हस्तकला शिक्षिका कल्पना बोरवणकर यांनी बोलताना मांडले.