फेरीवाल्यांमुळे बंद पडलेला सुभाष पथ पुन्हा सुरू; शिवाजी पथावरील वाहतुकीचा ताण कमी
ठाणे पश्चिमेकडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यांपैकी फेरीवाल्यांनी बाजारच भरवल्याने गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला सुभाष पथ पुन्हा सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारपासून या मार्गावर एसटी आणि टीएमटीच्या वाहनांनी प्रवेश करून स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरू केला. गेल्या काही वर्षांपासून एकदिशा मार्ग असलेल्या या रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद करून टाकला होता. एक प्रकारे हा रस्ता फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र होते. तसेच काही ठिकाणी रिक्षाचालकांनी मनमानी थांबा तयार करून रिक्षा उभ्या करण्यास सुरुवात केली होती. स्थानकाच्या दिशेने जाणारा एक रस्ताच बंद केल्याने उर्वरीत रस्त्यांवरील वाहतुकीचा भार वाढू लागला होता. अखेर बुधवारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या मार्गात बी-केबिन रस्ता, तलावपाळीकडून थेट येणारा शिवाजी रस्ता आणि जांभळीनाका येथून येणारा सुभाष पथ हे महत्त्वाचे रस्ते आहेत. सॅटिसच्या बांधकामानंतर यातील सुभाष पथवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सार्वजनिक वाहनांची वाहतूक बंद झाल्यामुळे या रस्त्यावर फेरीवाल्यांनी मनमानी अतिक्रमण सुरू केले होते. जागोजागी छत उभारून त्यांचा व्यवसाय तेजीत सुरू होता. अनेक गाळेधारकांनी आखून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापून व्यापार सुरू केला होता. त्यामुळे बाजारपेठेचा हा मुख्य रस्ता अतिक्रमणांनी व्यापून गेला होता. ही सगळी वाहने शिवाजी रस्त्यावरून जात असल्याने त्या रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणात ताण येत होता. हे टाळण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुभाष पथ पुन्हा नव्याने खुला करण्याच्या दृष्टीने या परिसरातील अतिक्रमणावर कारवाई केली. बुधवारपासून या मार्गावर सार्वजनिक वाहतुक सुरू करण्याचे आदेशी टीएमटी प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारपासून या मार्गावर पुन्हा वाहतूक सुरू झाली. फेरीवाल्यांकडून या कारवाईला विरोध होण्याची शक्यता होती. मात्र पोलीस बंदोबस्तामुळे त्यांचे काही चालले नाही.

वाहनांच्या लांबच लांब रांगा..
सुभाष पथाची रुंदी केवळ एक वाहन जाऊ शकते इतकीच असून रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पादचाऱ्यांची संख्या असल्याने वाहने हळू चालवावी लागत होती. त्यामुळे रस्त्यावर एकामागोमाग एक वाहनांची रांग लागत असे. अरुंद रस्त्यामुळे हा त्रास सहन करावा लागत असून रस्ता रुंद झाल्यास वाहनांना येथून वाहतूक करणे सोपे जाऊ शकणार आहे. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.
टीएमटीचे दोन थांबे..
शिवाजी रस्त्याऐवजी सुभाष रस्त्यावर टीएमटी धावत असल्याने शिवाजी रस्त्यावरील थांबे बंद करण्यात आले आहेत. जांभळीनाका, प्रभात हे बस थांबे वळवून सिद्धिविनायक मंदिर व मराठी ग्रंथसंग्रहालय इथे वाहतुकीसाठी थांबे उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली.