गार गार आइस्क्रीमची मजा कडक उन्हाळ्याशिवाय ती काय? जिभेवर चवीची पावले उमटवत, जीवाला तृप्त करणाऱ्या आइस्क्रीमचा आस्वाद म्हणजे अनेक खवय्यांसाठी पर्वणीच. काळानुसार आइस्क्रीमचा आकार, चव आणि अर्थातच किंमत बदलली असली तरी हा थंडगार, रंगीबेरंगी, मऊ लुसलुशीत खाद्यप्रकार खाण्यातली गंमत कायम आहे. आइस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती मिळणे विरळाच. अनेक देशी-विदेशी कंपन्यांचे नामांकित ब्रॅन्ड आइस्क्रीम व्यवसायात असले तरी घरगुती बनावटीची आइस्क्रीमही ठिकठिकाणी लोकप्रिय आहेत. पाचपाखाडी येथील ‘सुचिता होममेड पॉट आइस्क्रीम’ त्यापैकीच एक.
पूर्वी एका लाकडाच्या बादलीत बर्फ आणि मिठाच्या मिश्रणात धातूची बरणी ठेवून त्यात आइस्क्रीम बनवले जाई. बरणीच्या झाकणात लहान आकाराचा पंखा बरणीवरील चक्क्यामुळे फिरवून आइस्क्रीम गोठवले जाई. ते बनविण्यासाठी लागणाऱ्या बरण्या अमृतसरहून आणल्या जातात.
दोन ते १२ लिटर अशा विविध मापांत त्या मिळतात. त्यातील आइस्क्रीमला ‘पॉट आइस्क्रीम’ म्हणतात. काळानुरूप आता पॉट आइस्क्रीमचे प्रमाण कमी झाले आहे. आता मोठमोठी यंत्रे वापरून विविध कृत्रिम स्वादांचा वापर करून आइस्क्रीम बनवले जाते.
ठाण्यातील ‘खाऊगल्ली’ अशी ख्याती असलेल्या पाचपाखाडीत ‘सुचिता होम मेड पॉट आइस्क्रीम’ची बातच न्यारी आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या अस्सल स्वादांच्या आइस्क्रीमची चव येथे चाखायला मिळते. कोणत्याही प्रकारचे रासायनिक रंग वा सार न वापरता ती बनवली जातात. दूध आटवून ते थंड करून त्यावर आलेल्या मलईचा मऊपणा हे आइस्क्रीम खाताना नक्कीच जाणवतो. यात ताजी फळे वापरली जातात. दुकान सुरू झाल्यानंतर सुरुवातीला आंबा, शहाळे आणि केशर पिस्ता स्वाद येथे उपलब्ध होतो. खवय्यांचा वाढता प्रतिसाद पाहता येथे जांभूळ, काजू-किसमिस, चिकू, रोस्टेड अल्मंड(बदाम), मध-खजूर, फणस, पेरू, लिची, कलिंगड, संत्रे, वेलची, मलई आणि गुलकंद असे स्वाद उपलब्ध आहेत.
केवळ फळ आणि दूध वापरून हे पॉट आइस्क्रीम तयार केले जाते. शहाळ्याच्या आइस्क्रीमचे वैशिष्टय़ म्हणजे मध्यम आकाराची मलई असलेले शहाळे यात वापरले जाते.  तसेच जांभळाच्या सालीचा वापर करून आइस्क्रीम तयार केले जाते. याचे वैशिष्टय़ म्हणजे हे आइस्क्रीम विनासाखर आहे. त्यामुळे मधुमेहींना याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. तसेच सुक्या खजुराचे काप मधात भिजवून मध-खजूर (खजूर विथ हनी) आइस्क्रीम बनवले जाते. आंबा, जांभूळ यांसारखी फळे ही हंगामी असल्याने केवळ त्या काळातच त्या फळांचे आइस्क्रीम उपलब्ध असतात.

पुण्याची मस्तानी
मस्तानी हे पुणेरी पेयही येथे उपलब्ध आहे. जांभूळ, काजू-किसमिस, चिकू, रोस्टेड अल्मंड (बदाम), खजूर विथ हनी, फणस, पेरू, लिची, कलिंगड, संत्रा, मलई विथ इलायची आणि गुलकंद आदी प्रकारामध्ये मस्तानी येथे मिळते. तसेच येथे फालुदाही उपलब्ध आहे. यात लागणाऱ्या शेवईमध्ये कोणताही रंग वापरला जात नाही हे येथील फालुद्याचे वैशिष्टय़. तृप्ती एगडे यांनी तीन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. त्यांचे पतीचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यामुळे घराला हातभार म्हणून त्यांनी आइस्क्रीम पार्लर सुरू केले. व्यवसाय निवडल्यानंतर त्यांनी पुण्यातून त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले. पारंपरिक पद्धतीने आइस्क्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या बरण्या (पॉट) अमृतसर येथून आणल्या. ठाण्यात दोन ठिकाणी त्यांची आइस्क्रीम पार्लर आहेत. पाचपाखाडीव्यतिरिक्त विकास कॉम्लेक्स परिसरातही हे घरगुती आइस्क्रीम मिळते.
सुचिता होममेड पॉट आइस्क्रीम
स्थळ- प्रशांत कॉर्नरशेजारी, पाचपाखाडी, ठाणे (प).
वेळ- संध्याकाळी ४.३०
ते रात्री १२.
शलाका सरफरे