News Flash

कर्मचाऱ्यांअभावी करवसुली रखडली

वसई-विरार महापालिका हद्दीत ६ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत.

कंत्राटी कामगारांच्या कपातीचा फटका; १७९ कोटींचे वसई-विरार महापालिकेचे लक्ष्य, पण ८६ कोटीच वसूल

वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसली असून आयुक्तांनी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वानाचा युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु कंत्राटी कामगारांच्या कपातीचा फटका या करवसुलीच्या कामाला बसला आहे. चालू आर्थिक वर्षांत मागील वर्षांची थकबाकी धरून पालिकेला १७९ कोटी रुपये वसूल करायचे आहेत; परंतु सध्या फक्त ८६ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहे. कारण करवसुलीसाठी महापालिकेकडे पुरेसे कर्मचारीच नाहीत.

वसई-विरार महापालिका हद्दीत ६ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून चालू आर्थिक वर्षांत ९४ कोटी आणि मागील वर्षांची ८० कोटी रुपयांची थकबाकी धरून १७९ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी यासाठी बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. विरारमधून ४० कोटी तर नालासोपाऱ्यातून ८६ कोटी एवढी थकबाकी वसूल करायची होती. त्यापैकी विरारमधून १८ कोटी आणि सोपाऱ्यातून ३८ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

कर थकबाकीदारांकडून वसुलीसाठी पालिकेने यापूर्वीच सर्वाना नोटिसा बजावलेल्या होत्या. आर्थिक वर्ष संपण्याच्या आता अधिकाधिक करवसुली करण्यासाठी आयुक्त सतीश लोखंडे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. एक दिवसही सुट्टी न घेता करवसुलीचे काम हाती घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत; परंतु कंत्राटी कामगारांच्या कपातीचा मोठा फटका करवसुलीला बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काम करता येत नसल्याची कबुली एका अधिकाऱ्याने दिली. फेब्रुवारी महिन्यात पालिकेने अडीच हजार कंत्राटी कामगारांना कमी केले होते. त्याचा फटका बसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी विरार विभागात ४५ आणि नालासोपारा विभागात १५० कर्मचारी करवसुली विभागात होते. आता विरारमध्ये अवघे पाच आणि नालासोपाऱ्यात केवळ २० कर्मचारी आहेत. नवघरमध्येही पूर्वी ४० कर्मचारी होते, त्यांची संख्या १५ झाली आहे. आमच्याकडे पाच कर्मचारी आहेत. त्यापैकी तीन कर्मचारी काऊंटरवर बसतात. दोन कर्मचारी लोकांच्या घरोघरी कसे जाणार, असा सवाल विरारमधील एका करवसुली कर्मचाऱ्याने केला आहे. विरार विभागातून ४० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत केवळ १८ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

नाक्यावर थकबाकीदारांची नावे

पालिकेने घरपट्टी आणि मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विविध उपायजोजना सुरू केल्या आहेत. सर्व कर थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्यांची थकबाकी जास्त आहे अशांची नावे नाक्या-नाक्यांवर फलक लावून दर्शविण्यात आलेली आहेत. किमान पंधरा ते वीस ठिकाणी असे फलक लावण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरापासून शेकडो मालमत्ता सील केल्याची माहिती पालिकेने दिली. लवकरच त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. ज्या रहिवाशांनी कर भरलेला नसेल, त्यांच्या इमारतीखाली जाऊन त्यांना पंधरा मिनिटांच्या आता खाली येऊन कर भरण्याचे आवाहन केले जाणार आहे. पंधरा मिनिटांत ते खाली आले नाहीत तर त्यांची नावे जाहीरपणे घोषित केली जाणार आहेत. या कारवाईमुळे लोक कर भरतील, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला. लोकांना कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या ५१ शाखांमध्ये ऑनलाइन कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. काही गुंतवणूकदारांनी वसई-विरारमध्ये सदनिका घेऊन ठेवल्या असून गेल्या अनेक वर्षांपासून त्या बंद आहेत. त्यांचा या थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. सध्या रिकाम्या असलेल्या मालमत्ता सील केल्या आहेत. लवकरच निवासी घरे, कंपन्या सील करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 1:37 am

Web Title: tax recovery stuck due to less worker in vasai virar municipal corporation
टॅग : Vasai Virar
Next Stories
1 नव्या ६० बस रस्त्यावर कधी?
2 चिमाजी अप्पा यांचे भाईंदरमधील स्मारक रखडले
3 ग्रामस्थांकडून स्वखर्चाने तलाव
Just Now!
X