दहा महिन्यानंतर प्रथमच श्वासविश्लेषक यंत्राचा वापर; ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर सज्जता

किशोर कोकणे

करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या दहा महिन्यांपासून श्वासविश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करण्याचे काम बंद होते. मात्र, ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी या यंत्राद्वारे पुन्हा मद्यपी चालकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्लास्टिक नळीचा वापर करण्यात येणार असून ही नळी प्रत्येक कारवाईनंतर बदलून नष्ट करण्यात येणार आहे. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरात २५ डिसेंबरपासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा करोनामुळे मद्यपी तपासणी होणार नाही, या भ्रमात असलेल्या मद्यपी चालकांचा अपेक्षाभंग होणार आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने अशा चालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी श्वासविश्लेषक यंत्राची मदत घेण्यास सुरुवात केली होती. या यंत्रात फुंकर मारणाऱ्या व्यक्तीने मद्यप्राशन केले की नाही हे त्वरित समजते. या यंत्रांमुळे गेल्या काही वर्षांत ‘ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ करणाऱ्यांना अटकाव घालणे शक्य होत होते. मात्र, करोनाचे संकट उद्भवल्यानंतर संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी श्वासविश्लेषक यंत्राचा वापर बंद केला होता. परंतु, आता ३१ डिसेंबरच्या तोंडावर ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरातील एकूण १८ वाहतूक विभागांद्वारे २५ डिसेंबरपासून मद्यपी चालकांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक विभागाला दोन श्वासविश्लेषक यंत्रे देण्यात येणार आहेत.

पोलिसांची नवी शक्कल

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ही नवी शक्कल लढविली आहे. श्वास विश्लेषक यंत्रामध्ये प्लास्टिकची नळी बसविण्यात येणार आहे. प्रत्येक तपासणीनंतर ही नळी बदलण्यात येणार असून ती तात्काळ नष्टही केली जाणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हातमोजे, मुखपट्टी तसेच इतर सामुग्रीही पुरविण्यात येणार आहे. तसेच या कारवाईबाबत दोन दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येत्या २५ डिसेंबरपासून मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी श्वासविश्लेषक यंत्राचा वापर करण्यात येणार असून करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक तपासणीनंतर प्लास्टिक नळी बदलून ती नष्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

– बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.