ठाणे आणि आसपासच्या उपनगरांमधील सर्वात मोठा मॉल असा नावलौकिक मिरविणाऱ्या विवियाना मॉलच्या व्यवस्थापनाने ठाणे महापालिकेचे मालमत्ता कराचे सुमारे सव्वादोन कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा कर थकविल्याप्रकरणी मालमत्ता कर विभागाने मॉलमधील चार दुकानांना टाळे ठोकले असून संपूर्ण मॉलचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. विशेष म्हणजे, कराची रक्कम १५ दिवसांत भरा अन्यथा इतर दुकानांनाही टाळे ठोकू, असा इशाराही महापालिकेने मॉल व्यवस्थापनाला दिला आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली. घोडबंदर भागातील टिआरा या आणखी एका मॉलविरोधातही अशीच कारवाई करण्याचे बेत आखले जात असून हा मॉल बंद असल्याने संपूर्ण मॉलला सील ठोकता येईल का, याची चाचपणी केली जात आहे.
ठाणे शहराला विभाजून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाण पुलाजवळील प्रशस्त जागेमध्ये विवियाना मॉल उभा राहिला असून तो शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जातो. या अवाढव्य मॉलमध्ये वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा आहे. एकाच मॉलमध्ये १४ स्क्रीन असणारा हा एकमेव मॉल असून तिथे आंतरराष्ट्रीय ब्रँडची नामांकित दुकाने आहेत. यामुळे या मॉलमध्ये उच्चभ्रूंचा मोठय़ा प्रमाणात राबता असतो. मात्र महापालिकेचा मालमत्ता कर थकविल्यामुळे हा मॉल अडचणीत आला आहे. दीड वर्षांपासून मॉल व्यवस्थापनाने सुमारे सव्वा दोन कोटींचा मालमत्ता कर थकविला आहे. त्यापैकी सुमारे २५ लाख रुपये मॉल व्यवस्थापनाने महापालिकेकडे भरले आहेत. मात्र उर्वरित कराची रक्कम अद्याप भरलेली नाही. यामुळे या मॉलचा पाणीपुरवठा तोडण्यात आला आहे; तसेच चार दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर निर्धारक दीक्षित यांनी दिली. थकबाकीची भरली नाही तर अन्य दुकानांनाही सील ठोकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘टियारा’ही रडारवर
घोडबंदर भागातील टियारा मॉलने मालमत्ता कर थकविला असून हा मॉल बंद आहे. यामुळे मॉल व्यवस्थापनाकडून कराची वसुली कशाप्रकारे करता येऊ शकते, यासंबंधी विचार सुरू आहे, असे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी सांगितले.