गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेच्या तिजोरीत गेल्या महिनाभरापासून चांगले उत्पन्न जमा होऊ लागले आहे. त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रभाग सुधारणा, नगरसेवक, मागासवर्गीय निधी, पाणीपुरवठा आणि आपत्कालीन कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून या निधीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांसाठी पैसे मिळणार कधी आणि कामे पूर्ण होणार कधी, अशी ओरड नगरसेवकांकडून होऊ लागली होती. मात्र, आयुक्तांच्या निर्णयामुळे आता ही कामे मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच यानिमित्ताने निधीअभावी खोळंबलेली शहरातील विकासकामेही पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी ठाणेकरांना नवी स्वप्ने दाखवत सुमारे २१०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा अर्थसंकल्प २७०० कोटी रुपयांच्या घरात गेला. या अर्थसंकल्पात वाढीव खर्चाची नोंद घेण्यात आलेली नव्हती. यामुळे अर्थसंकल्पाचा आकडा सहाशे कोटी रुपयांनी वाढला. तसेच अर्थसंकल्पाचा कालावधी संपत आला तरी त्यास अधिकृत मंजुरी मिळालेली नव्हती. यामुळे हा अर्थसंकल्प काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडला. असे असतानाच अर्थसंकल्पात अपेक्षित धरण्यात आलेल्या उत्पन्नाची वसुली फारशी झालेली नव्हती. डिसेंबर महिनाअखेर ४६ टक्के उत्पन्न जमा झाले होते, तर त्यापैकी ४२ टक्के उत्पन्न खर्च झाले होते. जेमतेम दोन ते तीन टक्के उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होते. यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली होती.
दरम्यान, महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून धक्का बसलेले नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उत्पन्न वसुलीवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक संस्था कर भरण्यास ठेंगा दाखविणाऱ्या व्यापाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून छापे टाकण्यात आले आहेत. मालमत्ता आणि पाणीपट्टी कर थकविणाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. परिणामी, गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या तिजोरीत चांगले उत्पन्न जमा होऊ लागले असून महापालिका आर्थिक संकटातून बाहेर पडू लागली आहे.

कामांतील अडथळे दूर
महापालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे वर्षभरापासून प्रभाग सुधारणा निधी, नगरसेवक निधी, मागासवर्गीय निधी, पाणी पुरवठा आणि आप्तकालीन प्रस्तावांची कामे थांबविण्यात आली होती. प्रभागातील विकास कामे खोळंबल्याने नागरिकांकडून ओरड होऊ लागली होती. कामे रखडल्यामुळे नगरसेवक अडचणीत सापडले होते. अर्थसंकल्पाच्या आखणीनुसार या कामांकरिता पैसे कधी मिळणार आणि ही कामे पूर्ण केव्हा होणार, अशा पेचात नगरसेवक सापडले होते. दरम्यान, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रभाग सुधारणा निधी, नगरसेवक निधी, मागासवर्गीय निधी, पाणीपुरवठा आणि आप्तकालीन प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रभागातील गटार, पायवाटा तसेच अन्य कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.