पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

मुंबईची तुलना पाटणाशी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कोंडी करू पाहणाऱ्या शिवसेनेने रविवारी ठाण्यात अशाच मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांना िखडीत गाठण्याची खेळी केली. ठाण्यात आनंद दिघेंची शिवसेना राहिली नसल्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीदरम्यान परपक्षातून भाजपमध्ये आलेल्या उमेदवारांना बिभीषणाची उपमा दिली आणि रावणाच्या लंकेचे दहन करण्यासाठी हे प्रवेश दिले गेल्याचे समर्थन केले. नेमका हाच धागा पकडून ठाण्याची तुलना रावणाच्या लंकेशी करणाऱ्या फडणवीसांना ठाणेकर धडा शिकवतील, असा इशारा पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात नाराज असणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी हनुमान असा केला तर परपक्षातून पक्षात आलेल्यांना बिभीषणाची उपमा दिली. येथील भ्रष्ट लंका जाळण्यासाठी हे बिभीषण कामी येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नेमका हाच धागा पकडून एकनाथ िशदे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून ठाण्यातील सर्व नागरिक राक्षस आहेत, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे का, असा सवाल केला आहे. शिस्तबद्ध राष्ट्रवाद जपत बाळासाहेबांनी आणीबाणीला कधीच पाठिंबा दिला नव्हता. मात्र आणीबाणीच्या संदर्भात खोटा इतिहास सांगून मुख्यमंत्री ठाणेकरांची दिशाभूल करत आहेत. गुंडगिरीला प्रत्युत्तर द्या, असे भाजप कार्यकर्त्यांना सांगत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. या कारणासाठीच भाजपमध्ये गुंडांना संधी देण्यात आली आहे का, असा प्रश्न िशदे यांनी उपस्थित केला.

आणीबाणीचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा अपमान केला असून येत्या २१ फेब्रुवारी रोजी ठाण्यात कोणाची सेना आहे हे भाजपला ठाण्यातील शिवसैनिक दाखवून देतील असेही िशदे या वेळी म्हणाले. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांसारख्या भाजप नेत्यांना विसरत मुख्यमंत्र्यांना आनंद दिघेंचे नाव घ्यावे लागले, असा उपरोधक टोला शिंदे यांनी लगावला. शनिवारी भाजपचा गुंड मयूर शिंदे याने शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांना केलेली मारहाण केली. तसेच भाजपच्या प्रभाग क्रमांक १६ (ब)च्या उमेदवार कल्पना पाटील, त्यांचे पती राजेंद्र पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी भाजपचेच प्रभाग १६ (क)चे उमेदवार रजनीश त्रिपाठी आणि त्यांचे सहकारी गजेंद्र शर्मा यांनी दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा दाखला देत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.