17 December 2017

News Flash

सेनेची दिव्यात कोंडी

ठाणे महापालिका निवडणुकीत यंदा दिवा शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

शर्मिला वाळुंज, ठाणे | Updated: March 21, 2017 5:25 PM

 

पालकमंत्र्यांच्या सभेला जागा मिळेना; मनसेने मैदान पटकावले

ठाणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. शनिवार-रविवारी शहरात प्रचार सभांचा एकच धुरळा उडविण्याचे बेत राजकीय पक्षांनी आखले आहेत. दिव्यामध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे राज ठाकरे व कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी हजेरी लावली. मात्र अद्याप सत्ताधारी शिवसेनेची एकही सभा दिव्यात झालेली नाही. दिव्यातील शिवसेनेच्या सभेकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहिलेले आहे. मात्र शिवसेनेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्यासाठी दिव्यात मैदानच मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. निवडणूक व्यूहरचनेचा भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील एकमेव मैदान १९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षित करून ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत यंदा दिवा शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दिव्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सत्तेवर आल्यावर दिव्याचा विकास करू अशी आश्वासने सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून मतदारांना दिली जात आहेत. त्यातच दिव्यामध्ये प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन सभा घेत दिव्याच्या इतिहासात एका ऐतिहासिक घटनेची नोंद केली. त्यानंतर कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दिव्यात रोड शो करून कचराभूमीला भेट दिली. बुधवारी रात्री मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा येथे पार पडली. सभेत राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

दिव्यामध्ये शिवसेना, भाजप व मनसे अशी तिरंगी लढत असून दिवा मनसेचा बालेकिल्ला असल्याने येथे मनसेची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे. या भागात केवळ एकच मोकळे मैदान आहे. बाकी ठिकाणी मोकळ्या भूखंडावर बेकायदा बांधकामे मोठय़ा प्रमाणात उभी राहिली आहेत. दिवा शीळ रोडवरील प्रेरणा टॉवरजवळील मोकळी जागा ही एका खाजगी मालकाची आहे. ही जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ११ ते १९ फेब्रुवारीसाठी आधीच आरक्षित करून ठेवली होती. मात्र राज ठाकरे यांच्या प्रचारसभा काही कारणास्तव लांबल्याने ११ फेब्रुवारीला भाजपला हे मैदान मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी मिळाले. मात्र मनसेने आता शिवसेनेची कोंडी केली आहे.

शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शनिवारी दिव्यामध्ये होणार आहे. मात्र त्यांच्या सभेसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जागाच मिळत नाही. शिवसेनेची एकही सभा दिव्यात होऊ द्यायची नाही, अशी व्यूहरचना मनसेने आखली आहे. मनसेचे शैलेश पाटील आणि सुनीता मुंडे हे दोन्ही नगरसेवक आता शिवसेनेत आहेत. शिवसेनेने त्यांना तिकीट देत हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात आल्याचे सांगत येथे प्रचारास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेला धडा शिकविण्याचा निर्धार मनसैनिकांनी केला आहे.

शुक्रवारी १७ फेब्रुवारीला अभिजीत पानसे यांची सभा या मैदानावर आहे. ११ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ही जागा आरक्षित करून ठेवली आहे. काही कारणास्तव मैदान मिळणार नाही, या शक्यतेने आम्ही सर्व तारखा आरक्षित करून ठेवल्या होत्या.

तुषार पाटील, मनसे

शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी दिव्यामध्ये जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. त्यासाठी जागा अद्याप निश्चित झालेली नाही; परंतु प्रभाग क्रमांक २७ आणि २८ च्या मध्ये ही सभा आयोजित करण्यात येईल.

रमाकांत मढवी, शिवसेना

First Published on February 17, 2017 1:30 am

Web Title: thane elections 2017 shiv sena in diva mns