सुलक्षणा महाजन  शहर नियोजनतज्ज्ञ     

भारतामध्येच काय बहुतेक युरोपीय देशांमध्येही शहरे उभारण्याची एक पारंपरिक कला आणि रचनासंस्कृती होती. लहान गल्लीबोळ, अरुंद रस्ते आणि रस्त्याला लागून असलेली एक वा दुमजली-तिमजली घरे, त्यातच काही रस्त्यांवर खाली दुकाने किंवा उद्योग, मागे आणि वर घरे अशी पद्धत सर्वच मोठय़ा पारंपरिक शहरांत दिसत असे. ठाणे शहरही काही त्याला अपवाद नव्हते. उल्हास नदी आणि खाडीच्या बेचक्यात वसविलेले हे प्राचीन शहर व्यापारी, शेतकरी, कोळी आणि मीठ पिकवणाऱ्या लोकांचे वसतिस्थान होते. चेंदणीचा कोळीवाडा, स्टेशन रोडवरील व्यापारी दुकाने, शहरभर पसरलेली अनेक तळी आणि त्या काठी असलेली शेती, बागायती, चेंदणी, चरई, धोबीआळी, खारकर आळी, टेंभीनाका आणि जांभळी नाका. अनेक देवदेवतांची देवळे, चर्च, माशिदी आणि ज्यू लोकांचे सिनेगॉग असलेले हे शहर अनेक सामाजिक सांस्कृतिक लोकसंख्येने बनलेले महत्त्वाचे शहर होते आणि आजही आहे. रेल्वेने या शहराला जागतिक नकाशावर नेले आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर या शहराला आधुनिक औद्योगिक ओळख मिळाली. १९७४ मध्ये मी ठाण्याला राहायला येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तेव्हा ठाणे हे महानगर झालेले नव्हते. मात्र रेल्वे आणि टेलिफोनमुळे मुंबईला जोडलेले हे एक टुमदार शहर होते. तलावांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती. चांगल्या मराठी शाळा मुख्य म्हणजे मुंबईपेक्षा स्वस्त घरे असणारे हे गाव होते. तेव्हा कोपरी, घंटाळीदेवी परिसरात, भास्कर कॉलनी, राम मारुती रस्ता येथे नुकतीच फ्लॅट पद्धतीची घरबांधणी सुरू झाली होती. कुठूनही रेल्वे स्थानकात दहा मिनिटांत चालत जाणे शक्य होते. तेव्हा हे नवीन गाव सर्वत्र मी चालत जात ओळखीचे करून घेतले.

तेव्हाच्या गोखले रस्त्यावर मध्येच एक इमारत होती. त्यामुळे तो रस्ता नियोजन असूनही रुंद करणे खूप काळ कठीण झाले होते. तीच परिस्थिती जांभळी-टेंभी नाक्यावर होती. मुख्य वाहन टांगे हेच होते. रिक्षा तुरळक आणि महाग होत्या. वाहने कमी असली तरी स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात लोकांची गर्दी आणि पदपथावरील फेरीवाले यांची अडवणूक ही आधी पालिकेची आणि १९८२ नंतर झालेल्या महापालिकेची कायमची डोकेदुखी होती. ठाण्यासाठी विकास आराखडा होता आणि त्यानुसार सर्व रस्ते रुंद केले की ही समस्या सहज सुटेल अशीच तेव्हा सर्व नागरिकांची आणि प्रशासनाचीही धारणा होती. कमतरता होती ती प्रभावी प्रशासकाची. १९९८ मध्ये टी.चंद्रशेखर आयुक्त असताना त्यांनी शहरात रस्ते रुंदीकरण मोहीम राबवली. त्यामुळे मुख्यत: ठाण्यातील गर्दीच्या परिसरातील, ठाणे स्थानकाजवळच्या अनेक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. आता रस्ते रुंद झाले, पण नागरिकांचे हाल काही कमी झाले नाहीत. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत विकासाचे उपाय अतिशय तोकडे पडले आहेत. नागरी वाहतुकीचा विषय निघाला की सर्वात प्रथम टी.एम.टी. बस सेवेविषयी बोलतात. त्यातही सेवेतील कमतरता, सुधारणांपेक्षा आर्थिक घोटाळे आणि आरोप-प्रत्यारोपांचीच अधिक चर्चा होत असते. गावात बस सेवा देण्यासाठी असलेले रस्ते दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांनी किती व्यापले आहेत, त्यामुळे बस चालविण्यात किती अडचणी येतात, किती अपघात होतात, लोकांचा वेग कसा कमी होतो, त्रास कसा वाढतो तसेच तो का आणि कशामुळे होतो, याची चर्चा होतच नाही. बससेवेची गरज वाढलेली असतानाच अतोनात वाढलेली शहरातील वाहनसंख्या आणि बेजबाबदार वाहतूक वर्तन, तसेच खासगी वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यांची होणारी अडवणूक याची चर्चा होत नाही. चालणाऱ्या गरीब, वृद्ध सामान्य नागरिकांची शाळेतील मुलांची, स्त्रियांची अडचण, कोंडी आणि अपघाताची भीती यांचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. पादचारी हे शहरांच्या वाहतूक व्यवस्थेत खिजगणतीतही नसतात. हवेचे, आवाजाचे प्रदूषण, अपघात आणि वाहनांमुळे शहराची वाढलेली कुरूपता त्यांना समजतच नाही.

गेली दोन दशके जगातील सर्व प्रगत देशातील महानगरे वेगवान, भल्या थोरल्या आणि श्रीमंतीचा तोरा मिरविणाऱ्या खासगी मोटारींच्या आक्रमणाच्या विरोधात ठामपणे पावले उचलत आहेत. रस्त्यावरील मोटारींसाठी असलेल्या मार्गिका कमी करून लोकांसाठी पदपथ, सायकलपथ करीत आहेत. पादचारी हेच सर्वात जास्त प्राधान्य असणारे नागरिक असतात. ते प्रदूषण तर करीत नाहीतच, उलट स्वत:ची आणि शहराचीही प्रकृती उत्तमपणे सांभाळतात.