News Flash

ठाण्यातील तलावांचा सहा महिन्यांत कायापालट

ठाणे महापालिका हद्दीतील तब्बल ३६ तलाव परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील तब्बल ३६ तलाव परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका मुख्यालयास लागून असलेल्या कचराळी तलावाच्या दुरवस्थेच्या तक्रारी पुढे येत असल्याने १५ दिवसांत या परिसराचा सुशोभीकरणाचा प्रकल्प महापालिकेने पूर्ण केला. या धर्तीवर इतर तलावांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून कचराळीपाठोपाठ मासुंदा तलावाचे काम सुरू झाले आहे.
ठाणे शहरातील काही तलाव अतिक्रमणांमुळे बुजविण्यात आले, तर पुरेशा देखभालीअभावी अनेक तलावांची दुरवस्था झाली. सद्य:स्थितीत महापालिका हद्दीत ३६ तलाव अस्तित्वात असून निसर्गाचा हा वारसा जपण्याविषयी महापालिका पुरेशी गंभीर नाही अशा तक्रारी पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने केल्या जात आहेत. महापालिका मुख्यालयालगत असलेल्या कचराळी तसेच मखमली तलावाची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी मध्यंतरी पुढे आल्या होत्या. मासुंदा तलावाला बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा पडला असून त्यामुळे तलावाच्या किनारी कचरा टाकला जातो. ठाणेकरांकडून या संबंधीच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याची दखल घेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कचराळी तलावाच्या सुशोभीकरणाचे आदेश दिले होते.
या तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला आकर्षक फुलांची लागवड, निसर्गानुरूप रंगसंगती, पेव्हर ब्लॉकच्या दोन्ही बाजूस आकर्षक वृक्षांची लागवडीचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबविण्यात आला. याशिवाय तलावालगत चालण्यास येणाऱ्या रहिवाशांना सोयीचे ठरावे यासाठी पादचारी वाटेची दुरुस्ती, तलावाच्या पाण्याची स्वच्छता अशी कामेही करण्यात आली. यामुळे अवघ्या पंधरवडय़ात या तलाव परिसराचे रूपडं पालटले आहे. कचराळी तलावाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील इतर ३६ तलावांच्या सुशोभीकरणाचा आराखडा आखला असून येत्या सहा महिन्यांत सर्व तलावांची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. कचराळीपाठोपाठ मासुंदा तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यानंतर उपवन तलाव परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. अशाच पद्धतीने सर्व तलावांचा कायापालट करण्याचा प्रस्ताव आहे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 1:33 am

Web Title: thane lake transforming within six months
Next Stories
1 स्कायवॉकच्या कोपऱ्यावर पुन्हा कचरा
2 ‘पोद्दार इंटरनॅशनल’च्या कार्यालयाला टाळे
3 अपराधीपणाच्या भावनेनेच अमानुषता थांबेल..
Just Now!
X