जीवनावश्यक, अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग; बाजारपेठांत अंतर नियमांना हरताळ

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आणि पोलीस यांच्यातर्फे आज, गुरुवारपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या आदल्या दिवशी बाजारांत गर्दीचा नवा विक्रम पाहायला मिळाला. दहा दिवसांच्या टाळेबंदीदरम्यान वस्तू न मिळण्याच्या भीतीने जो तो बाजारात खरेदीसाठी येऊ लागल्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली या सर्वच शहरांतील बाजारपेठा गजबजल्या होत्या. या गर्दीत अंतर नियमन न पाळले गेल्यामुळे पोलीस, पालिका अधिकारीही हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

दुकानाबाहेरील रांगांमुळे नागरिकांना सामान खरेदीसाठी दोन ते तीन तासांची प्रतीक्षा करावी लागत होती. काही ठिकाणी विक्रेत्यांनी धान्य आणि भाजीपाल्यांच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ करून ग्राहकांची लूट केल्याच्या तक्रारी आहेत.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या ८ हजार ७७२ इतकी झाली असून शहरात दिवसाला २५० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरात दहा दिवस टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी २ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या एक दिवस आधी बुधवारी सकाळपासून ठाणेकर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी करण्यासाठी मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. नौपाडा, कोपरी, वागळे, सावरकर, लोकमान्य, वर्तकनगर, उथळसर, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदरच्या काही भागांतील किराणा दुकानांबाहेर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच ठाणे स्थानकाजवळ असलेल्या मुख्य बाजारपेठेतही नागरिकांनी कपडे, रेनकोट तसेच इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. तर जांभळीनाका येथील भाजी मंडई आणि खारकर आळीतील धान्य बाजारातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अंतरसोवळ्याच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

खरेदीसाठी २ ते ३ तासांच्या रांगा

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने आणि बाजारपेठेत बुधवारी नागरिकांची गर्दी झाली होती. सम-विषम पद्धतीने ही दुकाने खुली असल्यामुळे नागरिकांच्या रांगा वाढल्या होत्या आणि त्यामुळे खरेदीसाठी दोन ते तीन तासांची प्रतीक्षा करावी लागत होती. गेल्या वेळेप्रमाणे आताच्या टाळेबंदीतही वाढ होईल, अशी भीती असल्याने घरामध्ये किमान महिनाभराचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी अनेक नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले होते.

धान्य, भाजी महाग

ठाणे शहरातील अनेक विक्रेत्यांनी धान्य आणि भाजीच्या दरात बुधवारी मोठी वाढ केली होती. वाटाणा दहा रुपये, तर कारले आणि टोमॅटो २० रुपयांनी महागले होते. तसेच कोथिंबीर शंभर रुपये जुडी, बटाटे ४० रुपये किलो, शेपू २० रुपये, कांद्याची पात ४० रुपये, भेंडी, वांगी आणि गवार प्रत्येकी १२० रुपये किलो, कोबी ४० रुपये किलो तर एरवी ६० रुपये किलो दराने मिळणारा तांदूळ ९० रुपयांनी विकला जात होता.

टाळेबंदी हे तात्पुरते मलम ; भाजप आमदाराची टीका

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारपासून शहरात संपूर्ण टाळेबंदी करण्याच्या निर्णयावर भाजपचे ठाणे शहरातील आमदार संजय केळकर यांनी तीव्र विरोध केला असून ‘हे तात्पुरते मलम’ असल्याची टीका त्यांनी केली. ठाणे शहराला मलमपेक्षा ‘शस्त्रक्रिये’ची गरज असल्याचे ते म्हणाले.

आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील रुग्णवाढीला पालिका जबाबदार असल्याचे सांगत त्यासंदर्बातील उदाहरणे दिली. ‘करोनाबाधित रुग्णांची माहिती दिल्यावर संबंधित आरोग्य अधिकारी २४ तासात पुढील उपाययोजना करत नसेल तर संसर्ग वाढणारच. अशा काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. केवळ टाळेबंदीने परिणाम साधणार नाही तर अशा अधिकारी-कर्मचारी वर्गावर कारवाई करुन ही बिघडलेली यंत्रणा दुरूस्त करण्याची गरज आहे,’असे ते म्हणाले. रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असताना मृत्यूदरही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी होत आहे. मात्र केवळ टाळेबंदीने संसर्ग आटोक्यात येणार नाही. त्यासाठी काम करणारी यंत्रणाच दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

पालिका, पोलीस यंत्रणा सज्ज

* ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांत टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

* दोन्ही शहरांत पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. याशिवाय वाहतूक शाखेचे तीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी चौकाचौकांत तैनात केले जाणार आहेत.

* ठाणे शहरात साडेतीन हजार पोलीस आणि वाहतूक शाखेचे अडीचशे पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

* कल्याण-डोंबिवली शहरात दीड हजार पोलीस आणि वाहतूक शाखेचे ७० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

* उर्वरित साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात तैनात केला जाणार आहे.

* अशा प्रकारे संपूर्ण आयुक्तालयात म्हणजेच ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरात साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असून त्यात ८५० अधिकाऱ्यांचा सामावेश आहे.

* शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गावर पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार असून विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

संवेदनशील भागांत कठोर अंमलबजावणी

करोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असलेल्या संवेदनशील भागात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाण्यात सध्या २७२ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. त्यापैकी ज्या परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण आहेत, असे परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून तयार करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासन एकाच वेळी रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहे.  खासगी वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येणार नाही.