ठाणे महापालिका आयुक्तांचा इशारा

ठाणे : टाळेबंदी उठल्यानंतर सामाजिक जबाबदारीने वागता यावे यासाठी नागरिकांनी टाळेबंदीच्या काळात प्रतिबंधात्मक उपायांची सवय लावून स्वत:ला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, असे मत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केले. तसेच टाळेबंदी उठविल्यानंतर नागरिकांची सामाजिक जबाबदारीने वागण्याची तयारी नसेल आणि त्यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढू लागली तर पुन्हा टाळेबंदीचा निर्णय घेण्याची वेळ येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. येत्या एक-दोन दिवसांत शहरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन टाळेबंदी वाढवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी लागू केली जाते. घरोघरी सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे, परिसराची साफसफाई आणि रुग्णालय व्यवस्थापन अशी कामे  टाळेबंदीच्या काळात पालिकेला करावी लागतात, असे आयुक्त शर्मा यांनी सांगितले. टाळेबंदी उठविल्यानंतर करोनाची परिस्थिती निवळल्याचा अनेकांचा गैरसमज असतो. यातून ते मास्क वापरत नाहीत आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागतो. तसेच तरुण आणि तंदुरुस्त असल्याने काहीच होणार नाही, असाही अनेकांचा समज असतो. मात्र, त्यांचा हा समज चुकीचा असून आता सर्वच वयोगटातील नागरिकांना करोनाची लागण होत आहे. त्यामुळे या गैरसमजातून बाहेर येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि रुग्णालयात उपचाराची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी औषध येईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी टाळेबंदीचे निमित्त साधून स्वत:ला प्रशिक्षित करायला हवे. जेणेकरून टाळेबंदीनंतर सामाजिक जबाबदारीने वागता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आढावा घेऊनच निर्णय

ठाणे महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या टाळेबंदीची मुदत येत्या रविवारी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर टाळेबंदीची मुदत वाढवायची की नाही, हा निर्णय घेणे सोपे नसते. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, प्रसार माध्यमे आणि नागरिक या सर्वाचे काय मत आहे. तसेच शहरात करोनाची साखळी तुटली आहे का, याची खात्री होणे गरजेचे आहे. येत्या दोन दिवसांत याचा आढावा घेऊन जे चित्र समोर येईल, त्यावरून अंदाज घेऊन टाळेबंदीबाबत योग्य निर्णय घेऊ, असे आयुक्त शर्मा यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर, रुग्णालयांनाच औषधे पुरवठा

रेमडेसिविर, टॉसिलिझुम्ब ही औषधे महापालिकेकडे लवकरच उपलब्ध होणार आहेत. अनेकदा रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचे नातेवाईक ही औषधे शोधून आणतात आणि ती रुग्णाला देण्याचा आग्रह डॉक्टरांकडे धरतात. मात्र, ही औषधे सरसकट सर्वाना लागू होत नसल्याने केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिली जातात. त्यामुळे ही औषधे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात येणार नसून ती डॉक्टर आणि रुग्णालयांना देण्यात येणार आहेत, असे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.