रहदारीत अडथळा येत असूनही ठाणे महापालिकेचे दुर्लक्ष

 ठाणे : टेंभी नाका, पाचपाखाडी, चंदनवाडी, ओपन हाऊस, खोपट, ठाणे रेल्वे स्थानक परिसर या भागांत रहदारीचे आणि वर्दळीचे रस्ते अडवून नवरात्रोत्सवाचे मंडप उभारण्यात आले आहेत. विविध पक्षांचे नेते आणि स्थानिक नगरसेवकांचा वरदहस्त या उत्सवांवर आल्याची चर्चा आहे. महापालिका प्रशासन कारवाईत चालढकल करीत असल्यामुळे स्थानिकांत नाराजी आहे.

ठाणे शहराला उत्सवांची परंपरा आहे. दहीहंडीपासून गणेशोत्सवापर्यंतचे विविध सण उत्साहात साजरे केले जातात. मात्र हे उत्सव साजरे करताना होणारे नियमांचे उल्लंघन आणि नागरिकांचे हाल याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गणेशोत्सव संपताच आता नवरात्रोत्सवासाठी अनेक रस्त्यांचे मोठे भाग अडवण्यात आले आहेत. ठाणे स्थानकात सॅटिस पुलाखाली मंडप उभारण्यात आला आहे. या भागात स्थानकात ये-जा करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. भव्य देखाव्यासाठी मोठी जागा अडवण्यात आल्यामुळे रहदारीत अडथळा निर्माण झाला आहे, अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. गणेशोत्सवातही याच ठिकाणी मंडप उभारला होता. वारंवार वाट अडवली जात असल्यामुळे प्रवासी त्रासले आहेत.

ठाणे स्थानकापासून १० मिनिटांवर असणाऱ्या टेंभी नाका येथे जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नवरात्रोत्सवाचा मंडप उभारण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहने पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्यामुळे टेंभी नाका परिसरात मोठी कोंडी होत आहे. पाचपाखाडी येथेही अशाच प्रकारचा मंडप रस्त्यात उभारण्यात आला आहे. ओपन हाऊस येथे प्रशांत कॉर्नरजवळही मंडप उभारल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कोंडी होत आहे. खोपट येथे कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्ता अडवून मंडप उभारण्यात आल्याने वाहतुकीत अडथळे येत आहेत. पालिका यावर कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

ठाणे स्थानकाबाहेर उभारलेला मंडप हा रस्त्यात येत नाही. तो एका बाजूला उभारला आहे. उच्च न्यायालयाचे नियम डावलून मंडप उभारण्यात आलेला नाही.

– अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठाणे

झाडांवर आघात

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सॅटिस पुलाखाली उभारलेल्या मंडपामुळे या भागात सुशोभीकरणासाठी ठेवलेली छोटी झाडे झाकली गेली आहेत. काही कुंडय़ांतील रोपे मंडपामुळे दबून गेली आहेत. कुंडय़ांवर मंडपाचा भार येऊन कुंडय़ा तुटून खाली पडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.