07 August 2020

News Flash

चाळी, झोपडपट्टय़ांत संपूर्ण टाळेबंदी

वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, लुईसवाडी परिसरावर परिणाम

संग्रहित छायाचित्र

वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, लुईसवाडी परिसरावर परिणाम

जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : कळवा, मुंब्रा यांपाठोपाठ ठाण्यातील झोपडपट्टय़ा आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात करोनाचा सामूहिक संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागल्याने ठाणे महापालिकेने वागळे इस्टेटपाठोपाठ आसपासच्या संपूर्ण परिसरांत मंगळवारपासून १०० टक्के टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर यांपाठोपाठ वर्तकनगर परिसराचा बराचसा भाग तसेच पूर्व द्रुतगती महामार्गास लागून असलेला लुईसवाडी, काजुवाडी यांसारख्या परिसरातही ३ मेपर्यंत जीवनावश्यकत वस्तूंची दुकाने बंद केली जाणार आहेत. सुमारे सहा ते सात लाख लोकवस्तीचा परिसर या निर्णयामुळे प्रभावित होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा आणि मुंब्रा भागांत सर्वात आधी करोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. येथील दाट लोकवस्त्यांमधून नियमांची पायमल्ली झाल्याने हा आकडा वाढत गेल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. पहिल्या टप्प्यात कळवा, मुंब्रा भागांतील काही परिसरांपुरता मर्यादित असलेला करोनाचा प्रादुर्भाव गेल्या दोन आठवडय़ांपासून ठाण्यातील इतर भागांतही वाढू लागला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पलीकडील बाजूस असलेला वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, समता नगर, वर्तक नगर, शास्त्री नगर हा संपूर्ण परिसर दाट लोकवस्तीचा आहे. झोपडपट्टय़ा तसेच बेकायदा चाळींमधून राहणाऱ्या नागरिकांचा मोठा भरणा या भागात असून काही मोठय़ा इमारतींची उभारणीही गेल्या काही वर्षांत या पट्टय़ात झाली आहे. यापैकी काही भागांत करोनाबाधित आढळून आल्याने ठाणे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सतर्क झाले होते. या भागात सामूहिक संसर्ग होण्याची भीती व्यक्त होऊ लागल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वागळे इस्टेट परिसरात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून वागळे इस्टेट परिसरातील बराचशा भागांत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, हा निर्णय पुरेसा नसल्याची हरकत काही लोकप्रतिनिधींनी घेतली. त्यानुसार जुन्या आदेशाचा फेरआढावा घेत प्रशासनाने वागळे इस्टेट नव्हे तर लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीअंतर्गत येणारा बराचसा भाग संपूर्ण टाळेबंदीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला.

नव्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी

सोमवारी मध्यरात्रीपासून वागळे इस्टेट परिसरात औषधाची दुकाने वगळून येथील किराणा, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ३ मेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. त्यानुसार किसन नगर भटवाडी, किसन नगर २ आणि ३, गणेश चौक, शीव टेकडी, रोड नं. १६, रोड नं. २२ या परिसरांतील मासळी बाजार, चिकन, मटण, भाजीपाला, बेकरी, धान्याची दुकाने, दूध डेअरी ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. सोमवारी या निर्णयाचा फेरआढावा घेताना त्यामध्ये नव्या विभागांचा समावेश करण्यात आला. त्यानुसार संभाजी नगर, लेनिन नगर, जिजामाता नगर, रामचंद्र नगर, ज्ञानेश्वर नगर, लुईसवाडी, हाजुरी, सावरकर नगर, लोकमान्य नगर, यशोधन नगर, रवेची माता चौक, महात्मा फुले नगर, वेदांत कॉम्प्लेक्स रोड, विजय नगर, इंदिरा नगर, रुपादेवी पाडा तसेच आसपासच्या झोपडपट्टय़ांचा परिसरात ही टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2020 4:13 am

Web Title: thane municipal corporation imposed complete lockdown in chawl and slums zws 70
Next Stories
1 आठवडी बाजार बंद असल्याने आर्थिक तडाखा
2 व्यवस्थेने मारले, निसर्गाने तारले
3 सुके खोबरे, कांद्याच्या विक्रीतही ग्राहकांची लूट सुरूच
Just Now!
X