ठाण्यात इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, गॅ्रण्ड सेंट्रल पार्कचे भूमिपूजन

ठाणेकरांना मनोरंजन आणि विरंगुळय़ाची ठिकाणे शहरातच उपलब्ध व्हावीत, यासाठी पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांनुसार महत्त्वाच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ आज, शनिवारी रोवली जाणार आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांसाठी इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर आणि आबालवृद्धांसाठीच्या गॅ्रण्ड सेंट्रल पार्कच्या उभारणीसोबतच नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्याच्या कामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याकरिता ठाण्यात येत असून पोखरण परिसरात उभारण्यात आलेल्या कम्युनिटी पार्कचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना शहरांतर्गत मनोरंजन आणि विरंगुळय़ाचे पर्याय उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्या दोन वर्षांच्या अर्थसंकल्पांमध्ये केली होती. त्यानुसार विविध प्रकल्पांची घोषणाही करण्यात आली. या प्रकल्पांचे आराखडे तयार झाल्यानंतर आता इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, ग्रॅण्ड सेंट्रल पार्क या प्रकल्पांच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. यासोबतच नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारणीच्या कामालाही आता सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी शहरात येणार असून त्यांच्या हस्ते या प्रकल्पांची पायाभरणी पार पडेल.

कम्युनिटी पार्कचे लोकार्पण

पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील आठ हजार चौरस मीटर जागेवर कम्युनिटी पार्क उभारण्यात आले आहे. या ठिकाणी ४०० मीटर जॉगिंग ट्रॅक, अ‍ॅम्पिथिएटर, खुली व्यायामशाळा, इलेव्हेटेड वॉकवेज, मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र, योगा कोर्ट, लॉन अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रकल्प काय?

नोकरदार महिलांसाठी वसतिगृह

वसंत विहार येथील सिद्धाचल परिसरातील सुविधा भूखंडावर ठाणे महापालिका क्षेत्रातील नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार असून तिथे १५५ व्यक्ती राहू शकतील इतकी क्षमता असणार आहे. त्याचबरोबर वाचन खोली, टीव्ही बघण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कॅफेटेरिया सीसीटीव्ही आदी सुविधा या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर

पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील सुविधा भूखंडावर सुमारे २७ कोटी रुपये खर्चून बांधकाम विकास हस्तांतरणाच्या माध्यमातून हे जिम्नॅशियम सेंटर बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, योगा कक्ष आणि ३०० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्रॅण्ड सेंट्रल पार्क

कोलशेत रोड येथे बांधकाम विकास हस्तांतरणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँड सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. २०.५ एकर जागेमध्ये हे सेंट्रल पार्क बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याची जागा, थीम उद्यान, तलाव क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, आयकॉनिक पूल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.