ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत गेल्या काही वर्षांपासून घट होऊ लागली असून त्यामागे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा असल्याचे प्रमुख कारण अनेकदा पुढे आले आहे. यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पटसंख्या वाढविण्याकरिता ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून याचाच एक भाग म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करणे तसेच मराठी माध्यमातील शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण देण्याचे उपक्रम गेल्या वर्षांपासून हाती घेण्यात आले आहेत. मध्यंतरी, अनेक शाळा इमारतींची दुरवस्था झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेने या शाळा इमारतींच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेतली होती. यामुळे महापालिका शाळांच्या इमारतींची अवस्था बऱ्यापैकी चांगली असल्याचे चित्र आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या ८५ इमारतींमध्ये एकूण १३२ शाळा भरविण्यात येत असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि घोडबंदर आदी भागांत महापालिका शाळेच्या इमारती आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य विनामूल्य देण्यात येते. पाठय़पुस्तके, वह्य़ा, शालेय गणवेश, रेनकोट, पादत्राणे आदींचा त्यात समावेश असतो. असे असतानाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट होत असल्याची ओरड गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. असे असले तरी मराठी माध्यमाच्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत दरवर्षी दोन ते तीन हजारांनी वाढ होत असून त्यासोबत हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच गुजराती माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्येत मात्र घट होत असल्याची कबुली प्रशासन देत आहे.
दप्तरविरहित शाळा..
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दप्तरविरहित शाळा योजनेअंतर्गत प्राथमिक शाळांमधील पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी वर्गात शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र मांडणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून या विद्यार्थ्यांना दररोज आपली वह्य़ा-पुस्तके ने-आण करण्याची गरज भासणार नाही. या मांडणीमध्ये विद्यार्थ्यांची वह्य़ा-पुस्तके मावतील अशी व्यवस्था असणार आहे. पहिली आणि दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठासाठी वर्कशीट दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थी गृहपाठ करू शकतील. वर्कशीट फक्त आठवडय़ातून एकदाच विद्यार्थ्यांना आणाव्या लागणार असल्याने पहिली आणि दुसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने दप्तरविरहित शाळा होणार आहे.
इंग्रजी माध्यमावर भर..
ठाण्यातील किसननगर, सावरकरनगर आणि मुंब्रा येथील महापालिकेच्या शाळांमध्ये आठवी इयत्तेपर्यंत इंग्रजी माध्यमांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने पी.पी. पी. योजनेअंतर्गत सेवाभावी/स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने यंदा नववीचा वर्गही इंग्रजी माध्यमाचा सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी लागणाऱ्या वर्गाची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या ७६ शाळांच्या इमारतींमध्ये व्हच्र्युअल क्लासरूमसारखा नावीन्यपूर्ण उपक्रम महापालिका आगामी काळात राबविणार आहे. त्याचप्रमाणे आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब देण्याचाही महापालिकेचा विचार आहे.