News Flash

क्रीडा संकुलातील ठेकेदारीला अखेर चाप

ठाणे महापालिकेने मनोरुग्णालय परिसरात ‘मल्टी स्पोर्ट्स मिनी स्टेडियम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे मनोरुग्णालयातील संकुल महापालिकाच चालविणार
महापालिकेचे कोटय़वधी रुपये खर्च करून शहरात एखादे क्रीडा संकुल उभारायचे, पुढे ते खासगी ठेकेदारास चालवायला द्यायचे आणि सदस्य शुल्काच्या नावाखाली अवाच्यासव्वा दर आकारून सर्वसामान्य ठाणेकरांना संकुलाचे दरवाजे शुभारंभापूर्वीच बंद करून टाकायचे. ठाणे शहरात वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या संकुल उभारणीच्या या दुकानदारीला महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्या निर्णयामुळे चाप बसला आहे. शहराच्या पश्चिमेकडे उभारले जाणारे नवे संकुल महापालिकेमार्फतच चालविले जाईल, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
ठाणे महापालिकेने मनोरुग्णालय परिसरात ‘मल्टी स्पोर्ट्स मिनी स्टेडियम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशास्वरूपाचे हे शहरातील काही पहिले क्रीडा संकुल नाही. घोडबंदर भागातील रहिवाशांसाठी ढोकाळी परिसरात महापालिकेमार्फत उभारण्यात आलेले असेच एक संकुल नेमके कुणी चालवायचे या वादात आठ महिन्यांपासून बंद आहे. ठाणे शहरातील रहिवाशांना तरणतलाव तसेच अंतर्गत खेळांसाठी उपयुक्त ठरावे यासाठी खासगी ठेकेदारामार्फत उभारलेला ‘ठाणे क्लब’ यापूर्वीच वादग्रस्त ठरला आहे. महापालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गालगत उभारलेले तुकाराम ओंबळे आणि हेमंत करकरे क्रीडा संकुलात अधिकारी आणि नगरसेवकांनाच प्रवेश दिला जातो.
हा पूर्वानुभव लक्षात घेऊन मनोरुग्णालयालगत उभारण्यात येणारे स्टेडियम महापालिकेमार्फत चालविले जाईल, अशास्वरूपाचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला. त्याला आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही लागलीच मान्यता दिली असून, सुमारे तीन कोटी खर्च करून उभारल्या जाणाऱ्या संकुलाच्या चाव्या खासगी ठेकेदाराकडे जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात येणार आहे.

असे असेल संकुल..
मनोरुग्णालय पसिरातील ए.सी.सी. कंपनीच्या ७७० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सुविधा भूखंडावर हे संकुल उभारण्यात येणार आहे. या मिनी स्टेडियममध्ये तळ अधिक दोन मजल्याची सुविधा इमारत असून तळ मजल्यावर प्रशासन कार्यालय, टेबल टेनिस, कॅरम व चेस रूम्स, पहिल्या मजल्यावर पुरुष व महिलांकरिता व्यायाम शाळा व दुसऱ्या मजल्यावर स्कॉश कोर्ट व लॉकर रूम बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 2:35 am

Web Title: thane municipal corporation to undertake sports complexes of mental hospital
टॅग : Mental Hospital
Next Stories
1 डोंबिवलीत उद्या ‘चतुरंग’चे रंग संमेलन
2 ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’चे ठाणे शहरात स्वच्छता अभियान
3 ज्येष्ठ नागरिकांचीही शेतकऱ्यांना मदत
Just Now!
X