मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही ठाणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे महापालिका तसेच इतर शासकीय व्यवस्थापनांना अजूनही शक्य झालेले नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्डे बुजवणे शक्य होत नसल्याची कारणे महापालिका प्रशासनासह विविध यंत्रणांकडून पुढे केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही शहरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. रेल्वे प्रवास पुरेशा प्रमाणात सुरू झाला नसल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत खड्डेमय रस्त्यांमुळे जागोजागी वाहनकोंडी होऊ लागली आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. यामुळे आता बाजारपेठा, दुकाने आणि खासगी कार्यालयांचे कामकाज पूर्वपदावर येत आहे. त्यासाठी नागरिक घराबाहेर पडू लागले असून रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांत सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यातून वाट काढताना नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर महापालिका, एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ या यंत्रणांनी खड्डेभरणीची कामे केली होती. परंतु पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडल्याचे दिसून येत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे बुजविणे शक्य होत नसल्याचे दावे सर्वच यंत्रणांकडून करण्यात येत होते. परंतु आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही खड्डेभरणीची कामे सुरू झाली नसल्यामुळे नागरिकांना खड्डय़ातून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारे महामार्ग आणि त्यावरील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येतात. त्यापैकी सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीन हात नाका चौकातून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे हा रस्ता आधीच अरुंद झाला असताना त्यावर आता खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नितीन कंपनी चौकातील उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने हा रस्ता खडबडीत झाला आहे. तर, नितीन कंपनी चौकातील उड्डाणपुलावरही धूळ आणि खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे.

हाजुरी परिसर आणि महामार्गाला जोडणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय असल्याने शेकडो वाहने या मार्गावरून येत असतात. काही दिवसांपूर्वीच येथे काँक्रिटीकरण केले होते. मात्र, पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. तसेच घोडबंदर येथील कापूरबावडी चौक, मानपाडा, पातलीपाडा, आनंदनगर मार्गावर खड्डे पडले असून या ठिकणीही सर्वत्र धुळीचे वातावरण आहे.

यासंदर्भात एमएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शहरातील खड्डेमय रस्ते

* ठाणे शहरातील बाळकुम, कोलशेत, मनोरमानगर, ढोकाळी नाका, अबान पार्क, मीनाताई ठाकरे चौकातील रस्ता आणि त्यावरील उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.

* या रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने काही दिवसांपूर्वी बुजविले होते. परंतु आता या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

* कळवा- खारेगाव, विटावा परिसरांतील रस्त्यांवर उंच गतिरोधक तयार करण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम ठाणे-बेलापूर मार्गाच्या वाहतुकीवर होताना दिसतो.

* माजिवडा येथील चौकात महापालिकेने बसवलेले पेव्हर ब्लॉक हे खराब झाले असून यांमुळे रस्ता उंच-सखल झाला आहे.

पाऊस थांबल्यामुळे आता खड्डेभरणीची कामे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशाने सुरू करण्यात आली आहेत. तसेच रस्ते कुणाच्याही मालकीचे असले तरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिकेमार्फत या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका