गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात ठाणे पोलिसांची कारवाई

गणेशोत्सवाकरिता शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर विनापरवाना तसेच विनाअर्ज मंडप उभारणाऱ्या ठाण्यातील १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ठाणे महापालिकेने एक लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिलेले असतानाच आता गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. यासंबंधीची प्रक्रिया सहायक पोलीस आयुक्तांच्या स्तरावर सुरू आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विनापरवाना, विनाअर्ज मंडप उभारणे, दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित केली नाही आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केला. या कारणांमुळे नवी मुंबईतील तुर्भे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावून ही रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये भरण्याचे आदेश दिले होते. त्या धर्तीवर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाण्यातील सुमारे १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक लाख रुपये दंडाच्या नोटिसा देण्याचे आदेश दिले होते. तसेच नोटीस प्राप्त झाल्यानंतर ४८ तासात दंडाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये भरण्याचे निर्देशही दिले होते. त्यामुळे मंडळांचे धाबे दणाणले आहेत.

असे असतानाच गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषणाबाबतही आता ही मंडळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. गणेशमंडपाजवळील ध्वनिवर्धकांतून होणारा दणदणाट, गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ओलांडण्यात आलेली ध्वनिमर्यादेची पातळी याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांनी आधीच तक्रारी केल्या आहेत. याशिवाय ठाणे पोलिसांनीही ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई करण्यासाठी ३३ पोलीस ठाण्यात स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. या अधिकाऱ्यांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तपास सहायक पोलीस आयुक्तांमार्फत करण्यात येणार होता. त्यानुसार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये दहीहंडी तसेच गणेशोत्सवाच्या काळात ठाणे पोलिसांनी आवाजाची पातळी मोजणी केली. त्याआधारे साहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत त्यासंबंधीचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू असून त्यामध्ये आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याने पुढील आठवडय़ात अशा मंडळांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांच्याशी संपर्क साधला असता, उत्सवांच्या काळात पोलिसांनी ध्वनीचे मापन केले होते, त्याचे रेकॉर्ड तपासण्याची प्रक्रिया सहायक पोलीस आयुक्तांमार्फत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.