रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेल्या झाडांचे अशास्त्रीय पुनरेपण

एकीकडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पालिकेने झाडे तोडण्याचा सपाटा लावला असताना पोखरण रस्त्याच्या विस्तारासाठी तोडण्यात आलेल्या झाडांचे चुकीच्या पद्धतीने पुनरेपण करण्यात आल्याने यापैकी ७० झाडे मरणपंथाला लागली आहेत. पोखरण रस्त्यावरील रुंदीकरणामुळे बाधित होत असलेल्या २० जातीची ४३२ झाडांपैकी ७० झाडे दोस्ती विहार कॉम्प्लेक्स येथील महापालिका मैदानात पुनरेपण करण्यात आली आहेत. हे पुनरेपण करताना दोन झाडांमध्ये केवळ एक ते दोन फुटाचे अंतर ठेवण्यात आलेले असल्याने या झाडांची मुळे वाढण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही झाडे येत्या काही दिवसांत उन्मळून पडण्याची चिन्हे आहेत. ‘महाराष्ट्र गो ग्रीन फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवून या विषयी संताप व्यक्त केला आहे.

रस्ता रुंदीकरणादरम्यान तोडण्यात येणाऱ्या झाडांचे पुनरेपण करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या संस्थेतर्फे झाडांची अशास्त्रीय तोडणी आणि पुनरेपण करण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरण संस्थांनी केला आहे. ही झाडे उपटताना जेसीबीचा जोरदार फटका लगावला जातो. त्यामुळे झाडाची हानी होऊन हे झाड मृत्यू पावत आहेत. पोखरण रस्ता क्रमांक – येथून सुमारे ७० झाडे उपटून पुनरेपणासाठी दोस्ती विहार कॉम्प्लेक्स जवळच्या महापालिका मैदानामध्ये नेण्यात आली. परिपूर्ण वाढलेली ही झाडे एकमेकांपासून सुमारे १५ मीटर लांब लावण्याची गरज असताना ही झाडे अवघ्या एक ते दोन फुटांच्या अंतरावर लावण्यात आली. त्यामुळे या झाडांच्या मुळांना पसरण्यास वावच उरलेला नाही. परिणामी ही झाडे सुकून उन्मळून पडण्याच्या बेतात आहेत. शिवाय या मैदानामध्ये मोठय़ा प्रमाणात तोडलेल्या बांधकामाचे साहित्य टाकल्याने या मैदानाला क्षेपणभूमीची अवस्था प्राप्त झाली आहे. या परिसरातील गृहसंकुलांमधील नागरिकांनी या अशास्त्रीय पद्धतीने चाललेल्या कामाविरुद्ध संतप्त व्यक्त केला आहे. ठाण्यातील ‘महाराष्ट्र गो ग्रीन फाऊंडेशन’ या संस्थेच्या सदस्यांनी या प्रकरणी नुकतीच या मैदानातील पुनरेपण झालेल्या झाडांची पाहणी केली. त्या वेळी त्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे ही झाडे तात्काळ योग्य पद्धतीने पुनरेपित करावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

झाडे तोडण्यापेक्षा नवी मार्गिका तयार करा..

रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडण्यापेक्षा ही झाडे राखून छोटय़ा वाहनांसाठी झाडांच्या बाजूने वेगळ्या मार्गिकेची निर्मिती केल्यास झाडे वाचू शकतात. शिवाय रुंद रस्ता नागरिकांना वापरायला मिळू शकतो. महापालिकेने अत्यंत घाईमध्ये हा निर्णय घेऊन शहरातील हिरवळीची कत्तल सुरू केल्याने त्याचा त्रास नागरिकांनाच होत आहे. रस्त्यावरून वाहने चालवताना नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार असून हा त्रास दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने याविषयी पर्यावरणीयदृष्टय़ा निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत ठाणे सिटिझन व्हॉइस संस्थेचे कॅसबर ऑगस्टीन यांनी केले व्यक्त केले आहे.