माजातील सुस्थितीतल्या मुलांसाठी बालपणीचा काळ सुखाचा असं नसतं तर साधारणपणे आयुष्याचा प्रवास हा सुखासमाधानाचा असतो. नाण्याची ही एक बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला बालपणच हरवून बसलेली, दुर्बल स्तरातली मुले आहेत. लहान वयात विविध कारणांमुळे घरापासून दुरावलेली, स्टेशन किंवा फुटपाथवर राहणारी, पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारी (गैरउद्योग करणारी) ही मुले जगण्यासाठी पावलोपावली जीवघेणा संघर्ष करतात. एका पाहणीनुसार देशातील बेघर (जी घर सोडून रेल्वे प्लॅटफॉर्म/फुटपाथवर राहतात.) मुलांची संख्या ४ ते ८ लाखांच्या घरात आहे. यापैकी काही हजार मुले प्लॅटफॉर्मवर राहतात आणि त्यापैकी अतिशय थोडय़ा मुलांनाच या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळते.
ठाण्यातील समतोल फाऊंडेशन ही संस्था रेल्वे स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या घर सोडून आलेल्या मुलांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कार्य करणारी आहे. स्टेशनवर आढळून आलेल्या अशा मुलांशी बोलून त्याची पाश्र्वभूमी जाणून घेऊन, कुटुंबाची माहिती मिळवून, त्यांच्या समस्या लक्षात घेऊन परत कुटुंबाशी जोडून देण्याचे व्यापक कार्य समतोल करते. मूळ ज्या राज्यातील असेल त्या ठिकाणी जाऊन पालकांशी बातचीत करून, चर्चा करून, मुलाच्या भविष्याचा विचार करून पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन संस्थेतर्फे केले जाते.
मुलाचे हित आणि त्याचबरोबर सामाजिक समतोल राखण्याच्या व्यापक उद्देशाने प्रत्येक मुलाचे त्याच्या घरी त्याच्या गावी पुनर्वसन करण्यास प्राधान्य दिले जाते. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी संस्था ‘स- समता, म-ममता, तो-तोहफा आणि ल-लक्ष्य’ या चतु:सूत्रीवर कार्य करीत असते. आपले उद्दिष्ट साध्य होण्यासाठी संस्था त्या त्या ठिकाणच्या स्थानिक संस्था, मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय संस्था, संघटना, पोलीस यंत्रणा, बालकल्याण समिती, बालगृह, निरीक्षणगृह, चाइल्ड लाइन १०९८ यांच्याबरोबर जोडून घेऊन समतोल कार्य करीत आहे. ५ ते १२ वयोगटातील फक्त मुलांसाठीच संस्थेचे कार्य मर्यादित आहे.
समतोलचे १० ते १२ कार्यकर्ते कुर्ला, ठाणे, कल्याण, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल अशा ६ स्टेशनांवर रोज पाहणीसाठी जातात. संस्थेचे शेल्टर होम आणि ऑफिस मिळून ८ ते १० लोक काम करतात. अशा तऱ्हेने हे एक टीमवर्कच्या रूपात केले जाणारे कार्य आहे. समतोलचे संस्थापक विजय जाधव यांच्या मते ५ ते १२ वयाची मुले घर सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेऊन अमलात आणतात, असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण असे करण्यास भाग पाडणारी, त्यांना फसवू पाहणारी तिसरी व्यक्ती यामागे नक्की असते. अनुभवी कार्यकर्ते ही प्रथमच मुंबईला आलेली मुले शोधतात आणि जुन्या मुलांच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांच्याशी बोलतात. या बोलण्यातून त्यांचा विश्वास मिळवतात, त्यांची समस्या जाणून घेतात आणि मदतीचा हात पुढे करतात. त्या मुलाची स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंद करतात. पहिल्याच प्रयत्नात सर्व माहिती मिळणे शक्य नसल्याने मुलांना बालगृहात किंवा ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये असलेल्या शेल्टर होममध्ये ठेवले जाते. या मुलांना घरी परत जाण्यासाठी, कुटुंबाशी जोडून राहण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्या मुलाच्या विकास व पुनर्वसनाच्या दृष्टीने संस्था विशेषत्वाने प्रयत्न करते.
स्टेशनवरती बराच काळ राहणाऱ्या मुलांचे तेथे एक स्वत:चे जग झालेले असते. पोटाची खळगी भरण्यासाठी ते दिवसाला १०० ते १५० रु. कमावतात. जगण्याच्या या धडपडीत स्वत:ला खंबीरपणे उभं राहण्यासाठी सक्षम करताना त्यांचे बालपण करपून जाते. जगण्यासाठी सातत्याने संघर्ष करताना, अनेक यातना, अत्याचार सहन करताना भीती हा शब्दच त्यांच्या कोशात उरत नाही. या दुष्टचक्रात सापडल्याने ते परिस्थितीचे बळी ठरतात. अमली पदार्थाचे सेवन, जुगार खेळणे, चोऱ्यामाऱ्या करणे या गोष्टी करण्यास परिस्थितीच भाग पाडते. या मुलांना बोलतं करणं, या चक्रातून बाहेर पडण्यास प्रेरित करणं, सतत त्यांच्या संपर्कात राहणं हे कार्यकर्त्यांसाठी एक आव्हान असतं. समतोलचं हे आगळंवेगळं खरं तर समाजाची निकड लक्षात घेऊन केलं जाणारं कार्य, त्याची व्याप्ती, त्यातली गुंतागुंत, अनेकविध प्रक्रियांची पूर्तता, त्यांच्यावर असलेली जबाबदारी हे लक्षात घेता संस्थेचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जोखमीचेदेखील आहे हे प्रकर्षांने जाणवते.
घरापासून दुरावलेल्या या मुलांना पालकांकडे सुपूर्द करेपर्यंत काही काळ जातो तेव्हा काहींना शेल्टर होममध्ये आणले जाते. कार्यकर्ते या मुलांशी विविध माध्यमातून (संवाद, समुपदेशन, गाणी/गोष्टी, चित्रकला, योग, व्यायाम) संस्कारित करण्याचा, हळूहळू मत परिवर्तन करण्याचा, चांगले/वाईट समजावून देण्याचा प्रयत्न करतात. मुलाची पाश्र्वभूमी, त्याच्या अडचणी समजून घेऊन, उपाय सुचवून त्याने कुटुंबात राहणे कसे हितावह आहे ते समजावून सांगतात. जगण्याचे विरूप, प्रतिबिंब पाहणाऱ्या, प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या या मुलांवरील झालेले परिणाम, त्याची तीव्रता कमी व्हावी, त्यांना एक नवी दिशा मिळावी यासाठी मामणोली येथे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मनपरिवर्तन शिबिराचा उपक्रम राबवला जातो.