News Flash

सोसायटीचा मनमानी कारभार अंगलट

राम मारुती रोड परिसरातील जोग बंगला इमारतीचा पुनर्विकास होऊन २००७ मध्ये जोग टॉवर उभारण्यात आला.

गैरव्यवहार केल्याने ठाण्यातील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दररोज प्रत्येकी २५ रुपये दंड; सहकार खात्याचे आदेश
बेकायदा पद्धतीने कामकाज केल्याबद्दल ठोठाविण्यात आलेल्या दंडाच्या शिक्षेबाबत केलेले अपील सहकार खात्याने फेटाळून लावल्याने ठाण्यातील एका सोसायटीच्या संचालक मंडळाला प्रत्येकी दहा हजार रुपये भरावे लागणार आहेत. मनमानी कारभार केल्याने त्यांना २ फेब्रुवारी २०१५पासून दररोज २५ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम आता १० हजार रुपये झाली आहे. गैरकारभाराबद्दल सोसायटी सदस्यांवर दंडात्मक कारवाई होण्याची महाराष्ट्रातील ही बहुतेक पहिलीच घटना आहे. या निर्णयामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील संचालक मंडळाच्या बेबंदशाहीला लगाम बसेल, अशी अपेक्षा सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
ठाण्यातील राम मारुती रोड परिसरातील जोग बंगला इमारतीचा पुनर्विकास होऊन २००७ मध्ये जोग टॉवर उभारण्यात आला. मूळ इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनाही याच टॉवरमध्ये सदनिका मिळाल्या आहेत. अगदी सुरुवातीपासून या इमारतीत जुने आणि नवे असा वाद आहे. मात्र ३८ सदनिका असलेल्या या इमारतीत नव्यांची बहुसंख्या असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. जुन्या सदस्यांना सोसायटीची कमिटी अजिबात विश्वासात घेत नाही, अशी मूळ रहिवाशांची तक्रार आहे. जोग टॉवरमध्ये मूळ आराखडय़ानुसार चार मजल्यांची मंजुरी असताना आणखी तीन मजल्यांचे वाढीव बांधकाम अनधिकृतरीत्या करण्यात आले आहे.
नव्या सदस्यांच्या मनमानीविरोधात जितेंद्र वेदपाठक, सुरेश घैसास, अर्जुन कदम वा महेंद्र मोने या रहिवाशांनी उपनिबंधक कार्यालयाकडे दाद मागितली होती. उपनिबंधकांनी त्यावर सोसायटीच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. मात्र त्या वेळी सोसायटीने चक्क इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सुनावणीसाठी पाठविले. या सर्व बेबंदशाहीची दखल घेऊन ४ एप्रिल २०१५ रोजी उपनिबंधक प्रताप पाटील यांनी जोग टॉवरच्या विद्यमान व्यवस्थापन समितीला जबाबदार धरून २ फेब्रुवारी २०१५ पासून दरदिवशी २५ रुपये दंड ठोठावला. मात्र संचालक मंडळ या निर्णयाच्या विरोधात अपिलात गेले होते. त्यानंतर फेरसुनावणीत दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे.

जुन्या सदस्यांचे आक्षेप
* ८ फेब्रुवारी २०१० मध्ये सोसायटी स्थापन झाली, तेव्हापासून जोग टॉवरमध्ये एकही वार्षिक सभा झाली नाही.
* जुन्या सदस्यांना शेअर सर्टिफिकेट न देणे, दोष-दुरुस्ती अहवाल सादर न करणे, निबंधकांचे निर्देश पायदळी तुडविणे आदी कारभार केला जात होता.
* मूळ जोग बंगला वास्तूत राहणाऱ्या रहिवाशांना संचालकांकडून सापत्नपणाची वागणूक दिली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:35 am

Web Title: thane society officials to pay fine rs 25 daily due to fraud
Next Stories
1 ठाण्यात दोन दिवस पाणी नाही
2 अर्नाळा बेटाला धोका!
3 मीरा-भाईंदरचे फेरीवाले आता ‘स्मार्ट’
Just Now!
X