ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी अशा सर्वच प्रमुख शहरांमधील अंतर्गत वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी मोठय़ा शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. अवजड वाहने आणि त्यामधून दररोज होणारी कोटय़वधी रुपयांच्या मालाची उलाढाल पाहता अशा वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध आणले जाऊ नयेत यासाठी ठरावीक उद्योजक, दलाल आणि गोदाम माफियांच्या एका मोठय़ा साखळीचा दबाव वर्षांनुवर्षे पोलिसांवर राहिला आहे. या पाश्र्वभूमीवर उपायुक्त पालवे यांनी घेतलेला निर्णय अवजड वाहतुकीच्या कोंडीवर उतारा ठरू शकेल, अशी आशा आहे.
उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर आणि भिवंडीतील बेकायदा गोदामांच्या दिशेने होणाऱ्या अवजड वाहतुकीत अडकून पडणाऱ्या ठाणेकरांची सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेपुरती का होईना सुटका व्हावी यासाठी ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी उशिरा का होईना खंबीर पाऊल उचलले आहे. मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, नाशिक यासारख्या भागातून येणाऱ्या अवजड वाहतुकीस सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत ठाणे शहराच्या सीमेवरच रोखण्याचा ऐतिहासिक निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यासंबंधीची अधिसूचना जाहीर करताना पुढील महिनाभर हा बदल प्रयोगिक तत्त्वावर लागू केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण यासारख्या शहरांना चहूबाजूंनी अवजड वाहनांचा विळखा पडत असताना गेली अनेक वर्षे याविषयी स्थानिक पोलीस आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांनी बघ्याची भूमिका घेतली होती. जवाहरलाल नेहरू बंदरातील अवजड वाहतुकीचा भार ठाण्यावर पडू लागल्याने भिवंडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या या वाहनांसाठी स्वतंत्र्य मार्गिका असावी अथवा नव्या रस्त्याची उभारणी केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या गळी काही वर्षांपूर्वी उतरवला होता. त्यानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अवजड वाहनांमुळे ठाणे आणि आसपासच्या शहरांच्या वाहतुकीवर जाणवणाऱ्या विपरीत परिणामांचा एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला होता. एवढे सगळे करूनही दररोज करण्यात येणाऱ्या नियोजनापलीकडे फारसे काही झाले नाही. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे आणि ठाणे वाहतूक विभागाचे नवे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी मात्र वाहन बंदीचा निर्णय घेत किमान गर्दीच्या वेळांमध्ये तरी सर्वसामान्य प्रवाशांना कोंडीमुक्त प्रवास करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयोगाचे स्वागतच करायला हवे.
ठाणे शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना २४ तास मुक्त वावर असल्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होत असतो. हा ताण कमी करण्यासाठी शहरातील अंतर्गत भागातील वाहतूक नियोजनासाठी आवश्यक ते प्रयोग वेळोवेळी केले जात असले तरी ते पुरेसे नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे तसेच आसपासच्या शहरांचे मोठय़ा वेगाने नागरीकरण होऊ लागले आहे. कल्याण-शीळ मार्ग कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पुणे महामार्गाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीसाठी हमरस्ता ठरूलागला आहे. या मार्गावर मोठी नागरी संकुले उभी राहू लागली असून भविष्यात चौपदरी असणारा हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडेल हे आतापासूनच जाणवू लागले आहे. म्हणूनच या मार्गावर उन्नत महामार्ग तसेच उड्डाण पुलांच्या उभारणीचे वेगवेगळे प्रस्ताव चर्चिले जात आहेत. उरण भागात उभ्या असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरामुळे आसपासची गावे आणि नव्याने उभी राहात असलेली नागरी संकुले अवजड वाहतुकीच्या विळख्यात सापडली आहेत. या बंदरात तीन टर्मिनल उभी असून त्यामधून लाखो कंटेनर्सची हाताळणी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी चौथ्या टर्मिनलचे भूमिपूजन केले आहे. या टर्मिनलची उभारणी होताच येथील कंटेनर हाताळणीची क्षमता आणखी काही लाखांनी वाढणार आहे. बंदराच्या विस्तारीकरणाचा वेग मोठा असला तरी यानिमित्ताने वाढणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक पेलण्याची क्षमता या भागातील पायाभूत सुविधांमध्ये आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
गेल्या काही वर्षांत उरण येथील बंदर ते भिवंडी येथील गोदामांपर्यंत वाहतुकीची एक मोठी साखळी तयार झाली आहे. उरणमधून अजस्त्र कंटेनर घेऊन निघालेली वाहने तळोजामार्गे शीळफाटा येथे आणि पुढे मुंब्रा बायपासमार्गे खारेगाव टोलनाक्यावरून भिवंडीच्या दिशेने ये-जा करत असतात. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्ग, कळवा येथील साकेत बाजू, पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर रस्ता तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहतुकीचा भारही गेल्या काही वर्षांत काही पटींनी वाढला आहे. घोडबंदर मार्गाचा झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाण पुलांची उभारणी केली आहे. यामुळे भविष्यातील वाहन कोंडी टाळता येईल, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात या मार्गालगत असलेल्या नागरी संकुलांमधील वाहनांचा मोठा भार घोडबंदरवर दिसू लागला आहे. त्यामुळे उभारलेले उड्डाण पूलही कमी पडू लागल्याचे चित्र आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून या मार्गावर पूर्वी रात्री नऊनंतर अवजड वाहने सोडण्यात येत असत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत एकाच वेळी अवजड वाहने रस्त्यावर उतरत असल्यामु़ळे गायमुख, ओवळा तसेच भाईंदरलगत असलेल्या फाउंटन हॉटेलजवळ वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. जेएनपीटीमधून भिवंडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे कळवा, मुंब्रा, खारेगाव, शीळफाटा परिसर नेहमीच कोंडीत सापडल्याचे चित्र असते. या पाश्र्वभूमीवर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत ठाण्याच्या वेशीवर रोखण्याच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे.
धाडसी निर्णयाची गरज
नव्या बदलानुसार जवाहरलाल नेहरू बंदरातून कळंबोलीमार्गे ठाण्यात येणाऱ्या सहापेक्षा जास्त चाके असणाऱ्या वाहनांना ठरविलेल्या वेळेत दहिसर मोरी येथेच अडविण्यात येणार आहे. मुंबईकडून घोडबंदरमार्गे ठाण्यात येणाऱ्या वाहनांना शहरात बंदी करण्यात आली असून नाशिक महामार्गाद्वारे भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या वहनांनाही गर्दीच्या वेळेत सीमेवर रोखण्यात येणार आहे. याशिवाय, भिवंडीतील गोदामातून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठीही हाच नियम लागू करण्यात आला आहे. नव्या बदलामुळे रस्त्यावर दुपारच्या वेळेत वाहनांची रहदारी कमी असल्याने या वेळेत अवजड वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रात्री एकाच वेळेस अवजड वाहने रस्त्यावर येऊन होणारी कोंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. हे आणि अशासारखे महत्त्वाचे बदल करून वाहतूक पोलिसांनी अवजड वाहतुकीच्या नियोजनासाठी उशिरा का होईना धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुळात अवजड वाहनांच्या वाहतुकीचा भार शहरातील अंतर्गत वाहतुकीवर पडू नये अशाच स्वरूपाची रस्त्यांची रचना असणे आवश्यक आहे. मात्र ठाणे तसेच आसपासच्या शहरांचा विकास होत असताना वाहतूक नियोजनाच्या अंगाने वरवरच्या मलमपट्टीपलीकडे ठोस असा विचार झालेला दिसत नाही. उरण येथील बंदर आणि भिवंडी येथील गोदामांपर्यंत मोठय़ा वाहनांच्या दळणवळणाची एक मोठी साखळी उभी राहात असताना भविष्यात वाढणाऱ्या कोंडीचा यापूर्वीच विचार होणे गरजेचे होते. अवजड वाहनांसाठी नव्याने मार्गिका अथवा रस्त्याची उभारणी करण्यासंबंधीचा विचार ठाणे महापालिकेच्या पातळीवर सुरू झाला होता. तत्कालीन आयुक्त आर.ए.राजीव आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे अशा स्वरूपाच्या प्रकल्पांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र, आघाडी सरकारच्या काळात महापालिका स्तरावर आग्रह धरण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर विचारही झाला नाही. ठाणे वाहतूक शाखेचे पदभार स्वीकारताच उपायुक्त संदीप पालवे यांनी अंमलबजावणीच्या स्तरावर का होईना अवजड वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीवर उतारा शोधण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केल्याने ठाणेकरांच्या वाहतूक विभागाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!
loksatta analysis two new roads between mumbai to goa
मुंंबई – गोवा दरम्यान लवकरच दोन नवीन महामार्ग… आणि १३ विकास केंद्रे… कसे असतील हे प्रकल्प?