कोटय़वधी रुपये खर्च करून ठाणे शहरात उभारल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने भविष्यात होणाऱ्या कामांचा दर्जा राखण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मुख्यालयात सोमवारी उशिरा घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला. जेवढा खर्च या कामांवर केला जात आहे, तेवढे काम प्रत्यक्षात दिसत नसल्याची शंकाही या बैठकीत जयस्वाल यांनी उपस्थित केल्याने अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये रस्ता रुंदीकरण तसेच उड्डाणपुलांची कामे सुरू असून या कामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोखरण रस्ता क्रमांक एक येथील रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असले तरी या कामाचा दर्जा नीट राखला जात आहे का याविषयी आतापासूनच साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत जयस्वाल यांनी सोमवारी सायंकाळी एका बैठकीचे आयोजन केले होते.दर्जाविषयी खुद्द आयुक्तांनीच प्रश्न उपस्थित केल्याने अभियांत्रिकी विभागातील अधिकारी चक्रावून गेले.