तीन महिन्यांसाठी कारवाई; अन्य नियमांचा भंगही भोवणार

दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल ठाण्यातील तीन हजार वाहनचालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित होण्याची चिन्हे आहेत. रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला असून त्यासाठी मद्यपी चालकांची यादी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.
यापुढे अन्य वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या चालकांचे परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित होणार आहेत. या गुन्ह्य़ांची माहिती नोंदवून घेण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. अशा चालकांवर कारवाई केल्याचा अहवाल प्रत्येक तीन महिन्यांनी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वृत्तास ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे.
इतरांना तात्पुरता ‘दिलासा’
वाहतूक नियम तोडणाऱ्या सर्वाचेच परवाने निलंबित करण्यास रस्ता सुरक्षा समितीने सांगितले आहे. मात्र मद्यपी वाहनचालकांना न्यायालयापुढे हजर करावे लागत असल्याने त्यांची सविस्तर माहिती पोलीस नोंदवून घेतात. इतर नियमभंग करणाऱ्यांना दंड आकारून तात्काळ सोडले जाते. त्यामुळे त्यांची यादीच वाहतूक पोलिसांकडे नाही. त्यामुळे सध्याच्या कारवाईतून हे वाहनचालक तात्पुरते सुटले आहेत. तरी यापुढे त्यांचीही नावे यादीत समाविष्ट होणार आहेत.

या नियमभंगावरूनही परवाने निलंबन..

’ भरधाव वाहन चालविणे,
हेल्मेट न घालणे.
’सीट बेल्ट न लावणे, मोबाइलवर बोलत गाडी चालविणे. अमली पदार्थ सेवन करून वाहन चालविणे.
’क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी तसेच मालाची अवैध वाहतूक. सिग्नल तोडणे.