खासगीकरण थांबवण्याची मागणी; देशभरातील हजारो कामगार सहभागी

केंद्र शासन आयुध निर्माणीच्या अधिकारावर गदा आणण्याबरोबर या कामाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात आयुध निर्माणीच्या विविध कामगार संघटनांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. यात अंबरनाथ आयुध निर्माणीचे तीन हजार कामगार सहभागी झाले आहेत. संपूर्ण देशातील विविध निर्माणींत हा संप आहे.

तीन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने आयुध निर्माणाच्या कामात थेट परकीय गुंतवणुकीला मोकळीक दिल्यामुळे देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयुध निर्माणीच्या कामात कपात करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला आयुध निर्माणीत तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू खासगीकरणाच्या माध्यमातून तयार केल्या जात आहेत. त्यामुळे आयुध निर्माणीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत गेल्या महिन्यात आयुध निर्माणीच्या कामगारांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी युनियन, ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियन अंबरनाथ, आयुध निर्माणी मजदूर संघ आणि भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ यांसारख्या विविध संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. त्याच वेळी या संपाचा इशारा देण्यात आला होता.

आयुध निर्माणीचे बळकटीकरण करावे, खासगीकरण थांबवावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात आला आहे. आयुध संस्थांचे क्रियाशील राहणे फक्त कामगारांसाठीच नव्हे तर त्या शहराच्या अर्थकारणासाठीही महत्त्वाचे असून संस्थांना त्यांच्या क्षमतेने काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी या वेळी कामगारांनी केली आहे.