22 April 2019

News Flash

विहिरी, कूपनलिकांना खारे पाणी!

डहाणू तालुक्याच्या खाजण भागात कोलंबी प्रकल्पांची संख्या वाढू लागल्याने निमखाऱ्या पाण्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

खारट पाण्याची पातळी वाढली;  कोलंबी प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर

डहाणू तालुक्याच्या खाजण भागात कोलंबी प्रकल्पांची संख्या वाढू लागल्याने निमखाऱ्या पाण्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी गोडय़ा पाण्याचे स्रोत बदलून विहिरी ,कूपनलिकांना खारे पाणी येत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

डहाणू तालुक्यात कोलंबी प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत.  किनारपट्टीच्या भागातील डहाणू आणि पालघर तालुक्यात वाटप केलेल्या १०४  अधिकृत आणि ५०अनधिकृत प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांनी वाटप केलेल्या क्षेत्रापेक्षा सोयीच्या जागेत अतिक्रमण केल्यामुळे डहाणूजवळील अनेक  गावांत खारट पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक गावांना गोडय़ा पाण्याची तीव्रता भासू लागली आहे. त्यामुळे महसूल विभागाने ५० बेकायदेशीर कोलंबी प्रकल्प खालसा करून कारवाई केली.

तालुक्यातील वरोर, बाडा पोखरण, वाढवण, नंदारे, कंक्राटी, राई, नरपड चिखला, वाकी, सावटा गाव, दुबळपाडा, तलावपाडा, ब्राह्मणपाडा, नवा पैलाड, आगवण, डेहणे, वडकून, सरावली, मानफोड पाडा, आशागडपर्यंत गोडय़ा पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. डहाणू किनारपट्टीच्या लगतच्या काही गावांत गोडय़ा पाण्याची पातळी जाऊन खाजणामुळे खारट पाण्याची पातळी वाढू लागली आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले कोलंबी प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर आले आहेत.

शासनाने काही वर्षांपूर्वी सुशिक्षित बेरोजगार आणि मच्छीमारांसाठी सागरी मासेमारीला पर्यायी व उपयुक्त व्यवसाय म्हणून डहाणू गाव, वडकून, चिखले, सरावली, सावटा तसेच परिसरात काही मच्छीमारांना कोळंबी  संवर्धकांनी खाजण जागा भाडेपट्टय़ाने दिल्या होत्या. डहाणू तालुक्यातील अनेक मच्छीमारांनी सागरी मासेमारी व्यवसायास पूरक व पर्यायी व्यवसाय म्हणून शासनाच्या खाजणपट जागेत कोळंबी प्रकल्प विकसित केले आहेत. बोर्डी चिंचणी, मानफोड, तलावपाडा, चंडीगाव, सरावली, आसनगाव, आंबेवाडी, बाडा पोखरण, लोणीपाडा, वाणगाव या खाजण जमिनीमध्ये १०४ कोलंबी प्रकल्प वाटप केले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कोलंबी प्रकल्पांनी नियमबाह्य अन्य क्षेत्रात अतिक्रमण करून प्रकल्प चालवले आहेत. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. त्याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ५० अनधिकृत कोलंबी प्रकल्पावर कारवाई करून प्रांताधिकारी यांनी जागा खालसा केल्या आहेत.

टिवरीच्या झाडांची तोड

अनधिकृत कोलंबी प्रकल्पासाठी अनेक भागांत टिवरीची झाडेही तोडली गेली. त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. विशेष म्हणजे डहाणू तालुका पर्यावरण कमीटीचे न्या. धर्माधिकारी यांनी रिलायन्स कंपनीला डहाणू तालुक्यात टिवरीची झाडे लावण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र त्याचेही पालन झालेले नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मच्छीमारांनी कोलंबी प्रकल्पाची जागा ताब्यात घेण्यापूर्वी शासनाकडे प्रीमियमची रक्कम भरणा केली असून दरवर्षी शासनाचे भुईभाडे भरणा करून इतर कामासाठी खर्च केला असल्याचे म्हणणे मांडले आहे. कोळंबी संवर्धन व्यवसाय सागरी मासेमारी व्यवसाय पर्यायी व उपयुक्त व्यवसाय असल्याने हा व्यवसाय व या व्यवसायावर उपजीविका करणारे मच्छीमार, मजूरवर्ग टिकून राहावेत म्हणून वरील जागा खालसा करण्याचा आदेश रद्द करून पुन्हा गाव दप्तरी सातबारा उताऱ्यावर मच्छीमारांच्या नावांची नोंद होणे आवश्यक आहे.

– शशिकांत बारी, कोलंबी प्रकल्पधारक

खारट पाण्याची पातळी वाढल्यामुळे इंधन विहीरींचे पाणी दूषित होऊ लागले आहे.

– कमलेश राबड, चिखला

सरावली परिसरात खारट पाणी वाढू लागल्याने गोडय़ा पाण्याचे मासे मरू लागले आहेत.

– महेंद्र मेरे, सरावली

डहाणूतील बेकायदेशीर कोलंबी प्रकल्पावर कारवाई करण्यात आली असून सरकारी जागा खालसा करण्यात आल्या आहेत.

– राजेश निमगूळकर, सर्कल डहाणू

First Published on September 15, 2018 2:51 am

Web Title: through the columbian project ecosystem