आंबिवली रेल्वे स्थानकावरील काम सहा महिन्यांत उखडले

कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकात सहा महिन्यांपूर्वी बसविलेल्या लाद्या उखडल्या आहेत. त्यामुळे फलाटावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. घाईत असलेला प्रवासी या लाद्यांवरून चालताना अडखळून पडत आहेत.

याबाबत प्रवासी रेल्वे स्थानक मास्तर यांच्याकडे तक्रारी करीत आहेत. स्थानक मास्तर ही माहिती बांधकाम विभागाला देत आहेत, पण त्याची दखल घेतली जात नसल्याचे कळते.

सहा महिन्यांपूर्वी आंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक व दोनवर चेकर्स लाद्या बसविण्याची कामे ठेकेदाराने केली आहेत. निकृष्ट काम करण्यात आल्यामुळे या लाद्या निघाल्या आहेत, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. या भागातून ये-जा करताना प्रवाशांना त्रास होत आहे. अनेक प्रवासी पाय मुरगळून पडतात. सकाळ आणि संध्याकाळी लोकल पकडण्याची घाई असलेल्या प्रवाशांना या तुटलेल्या लाद्यांचा सर्वाधिक फटका बसतो.

प्रवाशाला गंभीर दुखापत झाल्यावरच रेल्वे प्रशासन तुटलेल्या लाद्या सुस्थितीत करण्याचे काम हाती घेईल का, असा प्रश्न कसारा-

कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रमण तरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केला आहे. खासदार कपिल पाटील यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली जाणार आहे, असे तरे यांनी सांगितले.